दिल्लीत खळबळ; भाजप खासदार रामस्वरूप शर्मांचा संशयास्पद मृत्यू


नवी दिल्ली: भाजपचे मंडी, हिमाचल प्रदेशचे खासदार रामस्वरुप शर्मा यांचा राजधानी दिल्लीमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. पहाटे त्यांचा मृतदेह गोमती या खासदार निवासस्थानी आढळून आला. त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

याबाबत दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खासदार रामस्वरूप शर्मा यांचे घर आतून बंद होते आणि त्यांनी गळफास घेतलेला होता. दरम्यान त्यांना दवाखान्यात नेण्यात आले, पण दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अद्याप तरी कुठलीही सुसाईड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाची चौकशी पोलीस करत आहेत.

दरम्यान माहिती मिळताच केंद्रीय वित्त राज्य मंत्री अनुराग ठाकूर रामस्वरूप शर्मा यांच्या घरी पोहोचले आहेत. तसेच शर्मा यांच्या मृत्यूनंतर आज संसदीय पक्षाची बैठक रद्द करण्यात आली आहे.