‘सीडीआर’वरून काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांना दिला सल्ला


मुंबई – सध्या राज्यात सचिन वाझे प्रकरण गाजत असून उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटक प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे सभागृहात फडणवीस यांनी सीडीआरचा हवाला देत तत्कालीन तपास अधिकार सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोपही केले होते. फडणवीस या प्रकरणातील सीडीआरवरून २ आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत काँग्रेसने फडणवीसांना सल्ला दिला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दरम्यान सीडीआर दाखवत सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या जबाबाचा हवाला देत वाझे यांनी हिरेन यांची हत्या केल्याचेही फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांनी मिळवलेल्या सीडीआरवर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. त्यानंतर आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.


कर्नाटक उच्च न्यायालयाच्या १५ मार्चच्या निर्णयाने आरोपीची खाजगी माहिती तिसऱ्या व्यक्तीला देणाऱ्या अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात येईल. देवेंद्र फडणवीसजी मिळालेल्या CDRचा स्त्रोत न सांगून व CDR स्वतः कडे ठेवून, ते २ आरोपींना पाठीशी घालत आहेत‌. त्यांनी गुन्ह्यात सहभागी होऊ नये विनंती, अशा आशयाचे ट्विट सावंत यांनी केले आहे.

सीडीआर मिळवणे हा गुन्हा असून नागरिक म्हणून तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे फडणवीस यांचे कर्तव्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडे असलेले पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई झाली पाहिजे, ही काँग्रेसचीही भूमिका आहे. सर्वांसाठी कायदा हा समान आहे. क्राईम ब्रँचने काही दिवसांपूर्वी CDR रॅकेट उघडकीस आणून त्यातील दोषींवर कारवाई केली होती. सामान्य लोकांना एक न्याय आणि फडणवीसांना दुसरा न्याय हे योग्य नाही. ते मुख्यमंत्री, गृहमंत्री राहिलेले आहेत. जबाबदार व्यक्ती आहेत. त्यांच्याकडील माहिती तपास यंत्रणांना देऊन सहकार्य करावी अशी अपेक्षा आहे, असे सावंत काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.