पालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शैक्षणिक कामे, पूर्वपरीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावल्यास होणार कारवाई


मुंबई : मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये शैक्षणिक कामे, पूर्वपरीक्षांसाठी विद्यार्थ्यांना शाळेत बोलावल्यास कारवाई केली जाणार आहे. थेट बोर्डाच्या परीक्षांसाठीच विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावण्याचे महानगरपालिकेने शिक्षण विभागाला निर्देश दिले आहेत.

अद्याप मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व बोर्डाच्या, माध्यमाच्या शाळा बंदच आहेत. शाळांनी नववी ते बारावीच्या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी व पूर्व नियोजित परीक्षांसाठी केलेल्या विनंतीवरून त्यांना महानगरपालिका शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. पण काही इतर बोर्डाच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष बोलावत असल्याच्या तक्रारी महानगरपालिका शिक्षण विभागाला प्राप्त होत असून शाळा बंद ठेवण्याच्या सूचना असताना या प्रकाराने महानगर पालिका आयुक्तांनी दिलेल्या निर्देशाचे उलंघन होत असल्याचे महापलिका शिक्षण विभागाच्या निदर्शनास आले आहे.

या कारणास्तव महापालिकेकडून जोपर्यंत अधिकृत निर्देश येत नाहीत, तोपर्यंत दहावी बारावी परीक्षा व प्रात्यक्षिक परीक्षांशिवाय विद्यार्थ्यांना शाळेत बोलावू नये, अशा सूचना महागरपलिका शिक्षण विभागाकडून पुन्हा १५ मार्च रोजी जारी करण्यात आल्या आहेत. राज्य बोर्डाच्या तसेच इतर बोर्डाच्या नियोजित आणि जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार परीक्षांसाठी महानगरपालिका शिक्षण विभागाकडून परवानगी देण्यात आलेली आहे. विविध कारणांसाठी ज्या शाळा किंवा महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शाळांमध्ये बोलावत असल्याचे निदर्शनास येईल अशा शाळा, संस्थांवर व सदर मुख्याध्यापकांवर कारवाई करण्यात येईल, असे पालिका शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ऑनलाईन, ऑफलाईन व इतर संबंधित कामकाज करण्यासाठी 50 टक्के शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी शाळेमध्ये आळीपाळीने उपस्थित राहत होते. पण सद्यस्थितीत मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता पालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार सर्व व्यवस्थापनाच्या आणि माध्यमाच्या शाळांच्या शिक्षकांना घरी राहून इ-लर्निंग शैक्षणिक सुविधानुसार आणि ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना 17 मार्चपासून पुढील आदेश मिळेपर्यत वर्क फ्रॉम होम म्हणजे घरी बसून काम करायचे आहे. शिवाय, अत्यावश्यक कामासाठी गरज पडल्यास शिक्षकांना हजर राहण्याचे आदेशात म्हटले आहे.