चीनी लस घेणाऱ्या भारतीयांना चीनी व्हिसा मिळणार
जगभर झालेल्या करोना प्रसारात चीनची भूमिका संशयास्पद असून करोना प्रसाराचा नक्की उगम कोठून झाला याचे उत्तर अजूनही मिळाले नसतानाच चीनने नवे फर्मान जारी केले आहे. त्यानुसार ज्या भारतीयांना चीनी व्हिसा हवा आहे त्यांना मेड इन चायना करोना लस घेणे बंधनकारक केले गेले आहे. अर्थात हे फर्मान जारी करताना चीनने भारतीयांसाठी व्हिसा नियम सुलभ केल्याचे म्हटले आहे. भारताच्या चीनी दुतावासाच्या वेबसाईटवर या संदर्भातले नोटीफिकेशन प्रकाशित करण्यात आले आहे.
बीजिंग कडून घेतल्या गेलेल्या या निर्णयानुसार चीनी व्हिसा हवा असलेल्यांना लसीकरण प्रमाणपत्र जमा करावे लागणार आहे. विशेष म्हणजे भारतात अजून कुठल्याच चीनी करोना लसीला मान्यता दिली गेलेली नाही. त्यामुळे चीनी दुतावासाच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली गेली आहे.
पाकिस्तान, ब्राझील, तुर्की, चिली, द.आशिया, काही अरब देशांनी चीनी करोना लसीला मान्यता दिली आहे. त्या देशांत वेगाने लसीकरण केले जात आहे. सिंगापूर, मलेशिया आणि फिलिपाईन्सने चीनी कंपनीची सिनोवॅक्स लसीसाठी करार केला आहे. जपान ने मात्र चीनी लसीला मान्यता दिलेली नाही आणि टोक्यो ऑलिम्पिक मध्ये जपानी खेळाडू चीनी करोना लस घेणार नाहीत असे अगोदरच जाहीर केले आहे.