सर्वाधिक महागड्या स्मार्टफोनमध्ये पहिले पाच आयफोनच

स्मार्टफोन ही आजची गरज झाली आहे आणि महागडे स्मार्टफोन आजची क्रेझ. आकर्षक, प्रीमियम स्मार्टफोनच्या किमती अगदी दोन ते तीन लाखांपर्यंत सुद्धा आहेत. मात्र जगातील सर्वाधिक महागडे फोन कल्पनेपलीकडे महाग आहेत. अगदी लग्झरी कार्स पेक्षाच नाही तर त्यांच्या किंमतीत अलिशान घर घेणेही शक्य आहे.

विशेष म्हणजे जगातील सर्वाधिक महागड्या स्मार्टफोन मध्ये पहिल्या पाच क्रमांकावर अॅपलचे आयफोनच आहेत. त्यात पहिल्या क्रमांकावर आहे फाल्कन सुपरनोव्हा आयफोन सिक्स पिंक, त्याची किंमत आहे ४.८ कोटी रुपये. हा फोन फाल्कनने डिझाईन केला असून आयफोन सिक्सचे हे कस्टमाइज मॉडेल पूर्ण २४ कॅरेट गोल्ड मध्ये आहे. त्यावर हिरे जडविले गेले असून त्याची केस सुद्धा रोज गोल्ड प्लॅटीनम मध्ये बनविली गेली आहे.

आयफोन ४ एस इलाईट गोल्ड हा जगातील दुसरा महागडा स्मार्टफोन असून त्यावर ५०० हिरे जडविले गेले आहेत. २४ कॅरेट गोल्ड मध्ये अॅपलचा लोगो ५३ हिरे लावून जडविला गेला आहे. यात प्लॅटीनम सह डायनोसोरच्या हाडाच्या खरा तुकडा सुद्धा वापरला गेला आहे. या फोनची किंमत आहे ३.६ कोटी. हे दोन्ही फोन फाल्कनने डिझाईन केले आहेत.

या यादीतला तिसरा फोन आहे आयफोन ४ डायमंड रोज. याची किंमत आहे ८० लाख रुपये. यात स्टार्ट बटण ७.४ कॅरेट सिंगल कट हिरे आहेत. चार नंबरवर असलेल्या गोल्ड स्ट्रायकर आयफोन ३ जीएस सुप्रीमचे डिझाईन ब्रिटीश डिझायनर स्टूआर्ट ह्युज व त्याची कंपनी गोल्ड स्ट्रायकरने केले आहे. २७१ ग्राम वजनाच्या या फोन मध्ये २२ कॅरेट सॉलिड गोल्ड मध्ये २०० हिरे जडविले गेले आहेत. त्याची किंमत आहे ३२ लाख. स्टार्ट बटण आणि अॅपल लोगोवर हिरे आहेत.

या यादीतील पाचवा महागडा फोन आहे आयफोन ३ जी किंग बटण. त्याची किंमत आहे २५ लाख. ऑस्ट्रेलियन डिझायनर पिटर अॅलिसन याने त्याचे डिझाईन केले आहे. त्यात स्टार्ट बटण मध्ये मोठा हिरा असून १८ कॅरेट सोन्याच्या या फोन मध्ये पिवळे, पांढरे आणि रोज गोल्ड हिरे आहेत. साईड स्ट्रीपवर १३८ हिरे आहेत.