शांत, सुंदर, पर्यटनाचा खरा आनंद देणारे पुड्डुचेरी

पाँडेचरी म्हणजेच आता पुड्डुचेरी हा केंद्रशासित प्रदेश सध्या निवडणुकांमुळे चर्चेत आहे. मात्र ज्यांना शांततेत काही दिवस घालवायचे आहेत अश्या पर्यटकांसाठी पुड्डुचेरी हे केवळ शांत नाही तर सुंदर आणि पर्यटनाचा वेगळा आनंद देणारे पर्यटन स्थळ सुद्धा आहे. गर्दीपासून दूर, पायी हिंडायला किंवा सायकलवरून निवांत भटकायला या सारखे दुसरे ठिकाण नसेल. पुद्दुचेरीला जाणार असला तर काही ठिकाणी अवश्य भेट द्यायला हवी.

पुद्दुचेरीचा हेरिटेज भाग म्हणता येईल अशी फ्रेंच टाऊन यातील प्रमुख. याला व्हाईट टाऊन असेही म्हणतात. पिवळ्या, पांढऱ्या, राखाडी रंगाच्या टिपिकल फ्रेंच स्टाईलच्या इमारती, घरे येथे पाहायला मिळतात. जणू इतिहासाची गाथा या इमारती सांगतात. रस्त्याच्या कडेने हवेवर डोलणारी पाम वातावरण जादुई करतात.

येथील विविध खाद्यपदार्थ पुरविणारी रेस्टॉरंट तुमची रसना तृप्ती करतात पण सायंकाळच्या वेळी चवदार पदार्थांचा आस्वाद घेत असताना मधूर संगीताने हा वेळ चांगला कारणी लागतो.

जवळच असलेल्या आरोवील शहरातील मातृमंदिर अवश्य पाहायला हवे. अर्थात ज्यांना साधना, ध्यान, अध्यात्म यात अधिक रस असेल त्यांनी येथे जायलाच हवे. मातृमंदिरात चार प्रचंड खांबांवर महेश्वरी, महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी प्रतिक स्वरुपात आहेत.

फ्रेंच टाऊन जवळचा असलेला रॉक बीच शांतपणे समुद्र लाटांचे संगीत ऐकत वेळ घालविण्याचे ठिकाण. सूर्योदय, सूर्यास्त दोन्ही वेळा येथे अप्रतिम दृश्य असते. पॅराडाईज बीच हा क्रिस्टल क्लिअर, निळ्याशार पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे फोटोग्राफीची मजा घेऊ शकता तसेच पाण्यातील खेळ खेळू शकता. या बीच भोवती सुंदर प्रोमेनाड म्हणजे रेंगाळत फिरण्यासाठी सुंदर पायवाटा आहेत.

रस्त्याकडेच्या कॅफेमध्ये बसून विविध पदार्थांचा स्वाद घेणे जसे आवश्यक तसेच पुद्दुचेरी मध्ये सायकलवरून भटकंती करणेही आवश्यक आहे. काही खास सेंटर्स अशी सोय करतात. फिश मार्केट, फ्लॉवर मार्केट, मंदिराला भेटी अशी भटकंती येथे करता येते. येथील प्रसिद्ध १७ व्या शतकातील मनकुनविनयगार गणेश मंदिरात हत्ती कडून आशीर्वाद घेण्यास मात्र विसरू नका.