१९२ वेळा टेस्ट देऊनही ड्रायविंग लायसन्स नाहीच

कोणत्याही देशात दुचाकी, चारचाकी वाहन चालवायचे असेल तर त्यासाठी ठराविक वयाची जशी अट असते तशीच वाहनचालक परवाना घेण्याचीही अट असते. प्रत्येक देशाचे त्या बाबतचे नियम वेगळे असतील पण वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी ड्रायविंग टेस्ट द्यावीच लागते. भारतासारख्या देशात काही जण घरबसल्या कुठलीही टेस्ट न देता चालक परवाना एजंटच्या मदतीने मिळवू शकतात पण पोलंड देशात ही सोय नाही.

परवाना मिळविण्यासाठी पहिल्याच प्रयत्नात टेस्टमध्ये पास होईलच याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. मग पुन्हा टेस्ट द्यावी लागते. एकाद्याला अशी टेस्ट किती वेळा द्यावी लागेल याची कल्पना केली तरी हा आकडा १०-२० च्या पलीकडे जाणार नाही. पण पोलंड मधील एका व्यक्तीने या बाबत रेकॉर्ड केले असून त्याने तब्बल १९२ वेळा ड्रायविंग टेस्ट दिली आणि तरीही तो नापास झाला आहे. वयाच्या ३० व्या वर्षापासून ते आता ५० वर्षाचा होऊनही तो ड्रायविंग टेस्ट पास होऊ शकलेला नाही. हा परवाना मिळविण्यासाठी त्याला शुल्कापोटी लाखो रुपयांचा खर्च आला आहे.

अर्थात इतकेवेळा टेस्ट द्यावी लागल्याचे रेकॉर्ड या व्यक्तीच्या नावावर असले तरी या लायनीत अनेकांनी पूर्वी नंबर लावला आहे. पोलंड मध्ये एका व्यक्तीने ४० वेळा टेस्ट देऊन परवाना मिळविला आहे तर एकाने ११३ वेळा टेस्ट दिली आहे. ४८ वर्षाच्या एका महिलेने ९३ वेळा टेस्ट दिली आणि ९४ व्यांदा टेस्ट देऊन तिने यश मिळविले असेही समजते.