भारतात नवमध्यमवर्गाची संख्या ६.३३ लाखांवर

जगभरात अब्जाधीशांची संख्या किती वाढली याचे रिपोर्ट नेहमीच येत असतात. त्यातच हरून इंडिया वेल्थ रिपोर्ट मध्ये यंदा नवीन मध्यमवर्गाची ओळख करून दिली गेली आहे. २०२० च्या या रिपोर्ट मध्ये भारतात नवमध्यमवर्गाची संख्या ६.३३ लाखांवर गेली आहे. ज्यांची वर्षाची सरासरी बचत २० लाख आहे त्याच नागरिकांचा या यादीत समावेश केला गेला आहे. असेही दिसून आले आहे की हा वर्ग त्यांच्या संपत्तीतील बराचसा हिस्सा जमीन, घर, कार्स यावर खर्च करतो.

या अहवालात असेही नमूद केले गेले आहे की देशात ज्यांची एकूण संपत्ती ७ कोटींहून अधिक आहे अश्या नवश्रीमंतांची संख्या ४.१२ लाख आहे. अर्थात यात डॉलर्स मध्ये कमाई करणारे करोडपती सुद्धा सामील आहेत. १ हजार कोटींची संपत्ती असलेल्यांची संख्या ३ हजार आहे.

दरवर्षी २५ लाख कमाई करणाऱ्या नागरिकांची संख्या ५.६४ कोटी आहे. भारतात एकूण कोट्याधीश ९.१२ लाख आहेत. मुंबईत सर्वाधिक म्हणजे १६९३३ कोट्याधीश असून त्याखालोखाल दिल्लीत १६ हजार, कोलकाता १० हजार, बंगलोर ७५९२, चेन्नई ४६८५ अशी ही संख्या आहे. यातील ७२ टक्के कोट्याधीश त्यांच्या कामाबाबत समाधानी आहेत आणि रियल इस्टेट, शेअर बाजार यात गुंतवणुकीस पसंती देतात.

परदेशात ब्रिटन भेटीस त्यांची सर्वाधिक पसंती आहे तर शिक्षणासाठी मात्र अमेरिकेला पसंती आहे. परदेशी गुंतवणुकीत सिंगापूर, युएईला अधिक पसंती आहे तर अलिशान कार्स बाबत पहिली पसंती मर्सीडीज आणि त्या खालोखाल बीएमडब्ल्यू आणि जग्वारला आहे. स्पोर्ट्स कार मध्ये सर्वाधिक पसंती लोम्बर्गिनी ला असल्याचे या अहवालात नमूद केले गेले आहे.