आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत; नितेश राणेंचा वरूण सरदेसाईंना इशारा


मुंबई – वरुण सरदेसाई आणि नितेश राणे हे सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर आमने-सामने आले आहेत. वरुण सरदेसाईंचे वाझे यांच्यासोबत संबंध असल्याचा दावा करत आमदार नितेश राणे यांनी यासंदर्भात एनआयएने चौकशी करण्याची मागणी केली होती. वरुण सरदेसाई यांनी राणे यांच्या आरोपानंतर त्यांना न्यायालयात खेचण्याचा इशारा दिला. देसाई यांच्या इशाऱ्यानंतर नितेश राणेही आक्रमक झाले आहेत. आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत, मला नोटी नोटीस पाठवली, तर आम्ही शिवसेनेची प्रकरणे बाहेर काढू, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला आहे.

नितेश राणे यांनी केलेल्या आरोपानंतर वरूण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. वाझे यांच्यासोबत संबंध असल्याच्या आरोपावर उत्तर देताना राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा आपण त्यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असे सरदेसाई यांनी म्हटले होते. त्याचबरोबर त्यांनी राणे कुटुंबियांची पार्श्वभूमी सांगत टीका केली होती. सरदेसाई यांनी दिलेल्या इशाऱ्याला नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरुण सरदेसाई यांना लक्ष केले.

सचिन वाझे आणि वरुण सरदेसाईंच्या संबंधांचा तपास यंत्रणांनी तपास करावा म्हणून मी माहिती उघड केली. वरुण सरदेसाई आता मला न्यायालयाच्या नोटिसीची धमकी देऊन माझ्यावर दबाव आणू पाहत आहेत का? मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. माझ्याकडे असलेली माहिती तपास यंत्रणांनी मागितल्यास मी देईन. सचिन वाझे यांच्याशी संबंध असल्याची माहिती समोर आणल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी आम्हाला नोटीस पाठवायची धमकी दिली. पण, त्यांनी नोटीस पाठवली तर आम्ही शिवसेनेची अनेक प्रकरणे बाहेर काढू, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.

३९ वर्षे आम्ही बाळासाहेब ठाकरे यांची सेवा केली असल्यामुळे आम्हाला शिवसेनेची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. आमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी तुम्ही काढत असाल, तर मग आम्हीदेखील रमेश मोरे, सोनू निगम, चंदू पटेल आणि नंदकुमार चतुर्वेदी ही प्रकरणे बाहेर काढायची का? ही माहिती बाहेर आली, तर तुमच्या कुटुंबाला महाराष्ट्रात फिरता येणार नाही, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे.