३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्याच्या व्हायरल मेसेजवर रेल्वे मंत्रालयाने दिले स्पष्टीकरण


नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने होत असतानाच देशभरातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा लॉकडाउन किंवा कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यातच आता भारतीय रेल्वेने ३१ मार्चपर्यंतच्या सर्व ट्रेन रद्द केल्याचे वृत्त सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे. रेल्वे मंत्रालयाकडून त्यावर अखेर निवेदनाद्वारे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.


यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्यात आल्याचे वृत्त तथ्यांवर आधारित नसल्याचे स्पष्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाने सोमवारी एका निवेदनाद्वारे, सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेले वृत्त दिशाभूल करणारे असून तथ्यांवर आधारित नाही. चुकीच्या न्यूज क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल केल्या जात आहेत. व्हायरल होणारा व्हिडिओ गेल्या वर्षीचा असून चुकीच्या संदर्भासह तो व्हायरल होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

त्याचबरोबर केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) या संस्थेनेही स्पष्टीकरण दिले आहे. रेल्वे रद्द केल्याचे वृत्त जुने आहे, ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द करण्याचा निर्णय भारतीय रेल्वेने घेतलेला नाही. चुकीच्या संदर्भासह जुनी बातमी शेअर केली जात असल्याचे पीआयबीकडूनही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे ३१ मार्चपर्यंतच्या ट्रेन रद्द केल्याचे वृत्त खोटे असून अशाप्रकारची कोणतीही घोषणा करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.