‘एनआयए’ने तपास पूर्ण झाल्यानंतर सर्वांसमोर बोलावे; जयंत पाटील


मुंबई – अंबानींच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास एनआयएकडून सुरू आहे. यासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर समोर येताना दिसत आहे. राज्याचे जलसंधारण मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यावरून एनआयएला सल्ला दिला आहे. सापडलेली स्फोटके आणि सचिन वाझे यांच्या चौकशीबाबत एनआयएने निष्कर्षाप्रत पोहोचल्यानंतरच बोलावे. दररोज विनाकारण बातम्या पसरवू नयेत, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जयंत पाटील यांनी एनआयएच्या तपासावर भूमिका मांडली. या सगळ्यामुळे तपास प्रक्रियेविषयी काहीच माहिती नसलेल्या समाजातील लोकांपर्यंत चुकीचा संदेश जातो. त्यामुळे प्रथम संपूर्ण तपास एनआयएने पूर्ण करावा. या प्रकरणाचा संपूर्ण छडा लागला की अधिकृतपणे सर्वांसमोर येऊन बोलावे. तपास केंद्रीय यंत्रणांनी जरुर करावा. पण, अमक्याने हे केले, ते केले, अशा बातम्या वर्तमानपत्रांमध्ये सोडू नयेत. जेव्हा पुराव्याआधारे ‘एनआयए’ने या सगळ्यावर निष्कर्ष जाहीर केल्यानंतर राज्य सरकार संबंधित दोषी व्यक्तींवर कारवाई करायला तयार असल्याचे पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी नारायण राणे यांच्यावरही टीका केली. पाण्याच्या बाहेर असल्यावर माशाची जशी तडफड होते, त्याप्रमाणे नारायण राणे यांची अवस्था झाली आहे. नारायण राणे यांना पुन्हा कधी सत्तेत जाऊन बसतो, असे झालेले असल्यामुळे काहीही झाले की ते राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतात. हाच न्याय लावायचा झाल्यास प्रथम उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल, असे म्हणत पाटील यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले.

जयंत पाटील यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आल्यापासून भाजप नेते सातत्याने सरकार पडणार, असे म्हणत आहेत. भाजप या अधिवेशनात पहिल्यांदाच विरोधी पक्षाप्रमाणे वागताना दिसला. देवेंद्र फडणवीस यांना खात्री झाली आहे की, आपल्याला पुढील साडेतीन वर्षे विरोधी पक्षातच बसायचे आहे. त्यानुसार त्यांनी अधिवेशनात विरोधी पक्षनेत्याची भूमिका पार पाडली. त्यांनी असे नेहमी करावे, विरोधी पक्षात बसण्याची सवय फडणवीसांनी अंगवळणी पाडून घेतली पाहिजे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.