पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना कोरोनाची लागण


पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असून पुण्यात कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कठोर निर्बंध लावले आहेत. पण, पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांना अशा स्थितीतही कोरोनाची लागण झाली आहे. सौरभ राव यांनी गेली वर्षभर कोरोनाशी लढण्यासाठी रणनिती आखली. पण अखेर आज त्यांनाच कोरोनाची लागण झाली आहे.

दरम्यान, शुक्रवारी विधानभवनात अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला सौरभ राव हे उपस्थित राहिले होते. सौरभ राव यांची कोरोना चाचणी केल्यानंतर आज दुपारी त्यांचा अहवाल आला. त्यात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे समोर आल्यामुळे सौरभ राव यांच्यासोबत असलेले अनेक अधिकारी आता विलगीकरणात गेले आहेत.

पुणे शहर पोलीस दलातील 6 हजार 500 पोलिसांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर 84 पोलिसांना कोरोना लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. पण यातील काही पोलिसांना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर पुन्हा कोरोनाची लागण झाल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पोलीस दलातील 42 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 16 पोलीस कर्मचारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर 26 पोलीस कर्मचाऱ्यांवर वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने घरीच विलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यामुळे पुणे शहर पोलीस दलात वर्षभरात 1 हजार 530 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.

पुण्यात काल (15 मार्च) दिवसभरात 678 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर पुण्यात काल 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एकजण पुण्याबाहेरील आहे. पुण्यात सध्या 370 गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण आकडेवारीचा विचार केला तर पुण्यात आतापर्यंत 2 लाख 19 हजार 285 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यातील 2 लाख 2 हजार 339 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 11 हजार 984 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 4 हजार 962 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.