सरकारी बँकांच्या खासगीकरणबाबत निर्मला सीतारामन यांचे मोठे वक्तव्य


नवी दिल्ली – आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीमध्ये एक नवी नॅशनल बँक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही बँक मोठ्या प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी स्थापन करण्यात येणार आहे. विकास वित्त संस्था, असे या बँकेचे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सरकारी बँकांच्या खासगीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरूनही सूचक विधान केले आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निर्मला सीतारामन यांनी याबाबतची माहिती दिली. अर्थसंकल्पामध्ये केंद्र सरकारने अशी बँक स्थापन करण्याची घोषणा केली होती. आता तिला कॅबिनेटने मान्यता दिली आहे. देशात सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांसाठी ही वित्तीय विकास संस्था निधी उपलब्ध करून देण्याचे काम करेल. नव्या संस्थेची शुन्यापासून सुरुवात होईल. सध्या एका बोर्डाची स्थापना केली जाईल. त्यानंतर हा बोर्ड पुढील निर्णय घेईल. तर सरकारकडून या बँकेला सुरुवातीला २० हजार कोटींचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी या पत्रकार परिषदेत प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारी बँकांच्या खासगीकरणाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सर्व सरकारी बँकांचे केंद्र सरकारकडून खासगीकरण करण्यात येणार नसल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले आहे. देशात स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँका बनाव्यात, अशी आमची इच्छा आहे. विकास वित्त संस्थेची स्थापना याच अपेक्षेने केली आहे. ती मार्केटच्या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वास निर्माला सीतारामन यांनी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या बँकेकडून बाँड जारी करून त्या माध्यमातून निधी उभारला जाणार आहे. त्या माध्यमातून पुढच्या काही वर्षांत ३ लाख कोटी रुपये उभे करण्याची अपेक्षा आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना टॅक्स बेनिफिट मिळेल. यामज्ये मोठे सॉवरेन फंड, पेन्शन फंड गुंतवणूक करू शकतील.