मुंबई जीपीओचा १०० वर्षांचा गौरवशाली इतिहास आता ई-पुस्तक रूपात


मुंबई : १०० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या मुंबई जनरल पोस्ट ऑफिसच्या इतिहासावर आधारित पहिल्या (डॉन अंडर द डोम या) ई-पुस्तकाचे डिजिटल प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आले. गोल गुंबझच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या मुंबईतील ऐतिहासिक जीपीओ इमारतीचा इतिहास डिजिटल पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे.

मुंबई जीपीओ चा इतिहास ई-पुस्तक रुपात उपलब्ध करुन दिल्याबद्दल अभिनंदन व्यक्त करुन राज्यपाल कोश्यारी म्हणाले की, जीपीओला गौरवशाली इतिहास लाभलेला आहे. देशातील प्रत्येक भागात पोस्ट ऑफीस सर्वसामान्यांपर्यंत पोहचलेले आहे. या पोस्ट ऑफीसच्या माध्यमातून अनेकांना चांगले अनुभव आले आहेत. अशा अनुभवांचा, लोकांच्या प्रतिक्रियांचा आणि कथांचा संग्रह करुन प्रभावी पुस्तिकेची निर्मिती केल्यास पोस्ट विभागाचा ऐतिहासिक ठेवा या संग्रहाच्या माध्यमातून जनसामान्यांसाठी उपलब्ध करता येईल, यासाठी पोस्ट ऑफीसने प्रयत्न करावेत.

मुंबईला ऐतिहासिक वारसा लाभलेल्या अनेक वास्तू आहेत. हा राष्ट्रीय ठेवा असून तो सुरक्षित ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. मुंबई पोस्ट ऑफीस नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून त्याचे जतन करीत आहे. याचा आनंद आहे. नवनवीन संकल्पनांच्या आधारे ई-पुस्तकाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा यापुढील काळातही जतन केला जावा, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी महाराष्ट्र- गोवाचे चीफ पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, मुंबई विभागाच्या चीफ पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांनी मुंबई जीपीओचा इतिहास, कामकाजाची माहिती आणि अविरत सेवेबाबत माहिती दिली.

सन १९१३ साली बांधून पूर्ण झालेल्या इंडो-सारसेनिक स्थापत्य शैलीतील जीपीओ इमारत वास्तूरचनाकार जॉन बेग व जॉर्ज विटेट यांनी डिझाइन केली होती. सन १९०४ साली इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली व १३ मार्च १९१३ रोजी जीपीओ इमारत बांधून पूर्ण झाली. इमारतीच्या बांधकामाला १८ लाख ९ हजार रुपये खर्च आल्याची माहिती स्वाती पाण्डे यांनी यावेळी दिली.