पुण्यातील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाला एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन जवाबदार?


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एमपीएसची परीक्षा पुढे ढकल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन केले होते. कोरोनाचा फैलाव या आंदोलनामुळे झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण या आंदोलनावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्यामुळे पुणे प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.

एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर पुण्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. मोठे आंदोलन यावेळी विद्यार्थ्यांनी केले होते. तब्बल आठ तास पुण्यातील प्रमुख रस्ता असलेला लाल बहादूर शास्त्री रस्ता विद्यार्थ्यांनी अडवून ठेवला होता. त्यानंतर या आंदोलनावर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

कोरोनाच्या नियमांचे या आंदोलनादरम्यान उल्लंघन झाले होते. त्याचाच परिणाम म्हणून पुणे पोलीस दलातील तब्बल पाच कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहे. यातील तिघे जण हे वरिष्ठ अधिकारी आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांना आंदोलन संपल्यानंतर कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता हे पाचही जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले.