ईडीने जप्त केली सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता


मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी आणि जावयाची मालमत्ता जप्त केली आहे. शिंदे यांची मुलगी प्रीती राज श्रॉफ आणि जावई राज श्रॉफ यांची मालमत्ता ईडीकडून दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रमोटर्स कपिल आणि धीरज वाधवान यांच्याशी संबंधित एका मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली मालमत्ता ही अंधेरीतील कालेडोनिया इमारतीमधील आहे.

याबाबत माहिती देतान ईडीने म्हटले आहे की, मनी लॉन्ड्रिंग कायद्यांर्तग (पीएमएलए) कारवाई केलेल्या मालमत्तांमध्ये अंधेरी (पूर्व), मुंबई येथील कॅलेडोनिया बिल्डिंगमधील 10,550 चौरस फूट दोन व्यावसायिक मालमत्तांचा समावेश आहे. राज श्रॉफ आणि त्यांची पत्नी प्रीती श्रॉफ यांच्या मालकीची 35.48 कोटींची मालमत्ता आहे. प्रीती श्रॉफ कॉंग्रेस नेते सुशील कुमार शिंदे यांची मुलगी आहे.

दीवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेडला पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) दिलेल्या 3,688.58 कोटींच्या कर्जाला घोटाळा घोषित केले आहे. या कंपनीची येस बँकेतील घोटाळ्याबाबतही चौकशी सुरु आहे. कंपनीचे प्रमोटर वाधवान बंधू सध्या अटकेत आहेत आणि ईडीने त्यांची मालमत्ता देखील जप्त केली आहे. येस बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी ईडीने माजी बँक प्रमुख राणा कपूर आणि डीएचएफएलचे प्रमोटर कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्याकडे 2400 कोटी रुपयांची संपत्ती अटॅच केली आहे. यात राणा कपूरचे 1000 कोटी आणि वाधवान बंधूंच्या 1400 कोटी रुपयांच्या मालमत्तेचा समावेश आहे.

नोव्हेंबरमध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने दिवाळखोरी प्रक्रियेसाठी डीएचएफएलला नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल (एनसीएलटी) सोपवले आहे. डीएचएफएल ही पहिली वित्तीय कंपनी आहे, ज्या कंपनीला आरबीआयने एनसीएलटीला कलम 227 अंतर्गत विशेष अधिकारांचा वापर करून पाठवले. तत्पूर्वी कंपनीचे बोर्ड बरखास्त करण्यात आले आहे आणि प्रशासक म्हणून आर सुब्रमण्यम कुमार यांची नियुक्ती केली गेली. आयबीसी अंतर्गत ते रिझोल्यूशन प्रोफेशनल देखील आहे.