डूकाटीच्या दोन शानदार बाईक्स भारतात सादर

लग्झरी कार आणि बाईक निर्मात्या डूकाटीने बीएस ६ नॉर्मवर आधारित स्क्रँबलर मॉडेलच्या दोन बाईक्स भारतीय बाजारात आणल्या आहेत. स्क्रँबलर नाईटशिफ्ट आणि स्क्रँबलर डेझर्ट स्लेड या नावाने या बाईक्स सादर केल्या गेल्या असून पाहताक्षणी भुरळ पडावी इतक्या आकर्षक रुपात त्या सादर केल्या गेल्या आहेत.

दोन्ही बाईक्ससाठी ऑफ रोड आणि दीर्घ प्रवासात उत्तम बॅलन्स राहिल असे टायर्स आहेत. ८०३ सीसी एल ट्विन टू व्हॉल्व इंजिनमुळे रायडिंगचा जबरदस्त अनुभव चालकाला मिळणार आहे. बाईकला सहा स्पीड गिअरबॉक्स, हायड्रोलिक कंट्रोलसह चालणारा मल्टीप्लेट क्लच सपोर्ट, फ्रंट रिअरला एलईडी लाईट्स दिले गेले आहेत. नाईटशिफ्ट मॉडेलमध्ये कॅफे रेसर स्टाईल फ्लॅट सीट आहे. यामुळे रायडर आणि प्रवासी आरामदायी प्रवासाचा अनुभव घेऊ शकणार आहेत.

नाईटशिफ्ट मॉडेलची एक्स शो रूम किंमत ९ लाख ८० हजार आहे तर डेझर्ट मॉडेलची किंमत १० लाख ८९ हजार अशी आहे. या दोन्ही मॉडेल्सचे बुकिंग सोमवार पासून सुरु झाले आहे. कंपनीची भारतात दिल्ली, एनसीआर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, हैद्राबाद, बंगलोर, कोच्ची, कोलकाता आणि चेन्नई अशी नऊ ठिकाणी वितरण केंद्रे आहेत. या पैकी कोणत्याही डीलर कडे बुकिंग करता येणार आहे.