ब्रिटन पंतप्रधान बोरीस जॉन्सन भारत भेटीवर येणार

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन एप्रिल अखेर भारत भेटीवर येणार आहेत. ब्रिटन पंतप्रधान कार्यालयाकडून सोमवारी ही माहिती दिली गेली असून युरोपियन युनियन मधून बाहेर पडल्यावर जॉन्सन यांचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय दौरा असल्याचे त्यात नमूद केले गेले आहे. या भेटीत चीनच्या आक्रमक हरकतींना आवर घालण्यासाठी कोणती कडक पावले उचलावीत या विषयी दोन्ही पंतप्रधानांच्या मध्ये चर्चा होणार असल्याचे समजते.

जानेवारी २०२१ च्या भारताच्या ७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोरीस जॉन्सन यांना पंतप्रधान मोदी यांनी आमंत्रित केले होते आणि ते आमंत्रण जॉन्सन यांनी स्वीकारलेही होते.पण त्यावेळी ब्रिटन मध्ये करोनाचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात झाल्याने जॉन्सन यांनी भारत भेट रद्द केली होती. पण त्यावेळी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना भारतात येण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते. जून मध्ये होणाऱ्या जी ७ समिट पूर्वी जॉन्सन भारतात येत आहेत.

जून मध्ये होणाऱ्या जी ७ समिट साठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनला जाणार आहेत. ब्रिटन आणि चीन यांच्यात अनेक मुद्द्यांवर मतभेद आहेत. जॉन्सन यांच्या भारत दौऱ्यावर चीनची बारीक नजर असल्याचेही सांगितले जात आहे.