चिनाब रेल्वेपुलाची खालची कमान जोडली, ‘शिवाजी महाराज की जय’ जयघोष

जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी थेट रेल्वे सेवा सुरु होण्याचा दिवस आता फार लांब राहिलेला नाही. जगातील सर्वाधिक उंचीवरच्या रेल्वे पूल चिनाब रेल्वे ब्रीजच्या कमानीचा खालचा भाग यशस्वीरित्या जोडला गेला असल्याचे रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विटरवरून जाहीर केले आहे आणि त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. अतिशय दुर्गम भागात हा पूल उभारला जात असून या महिनाअखेर पुलाचा वरचा भागही जोडला जाणार आहे आणि मग त्यावर रूळ टाकले जाणार आहेत.

२७२ किमी लांबीच्या या मार्गापैकी १६१ किमीचा मार्ग पूर्ण झाला असून त्यावर ११९ बोगदे बांधले गेले आहेत. हा संपूर्ण मार्ग आणि त्यावर समुद्रसपाटी पासून ३५९ मीटर म्हणजे १०५० फुट उंचावर बांधला गेलेला हा पूल म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाचा बेजोड नमुना मानला जात आहे. हा पूल आयफेल टॉवर आणि कुतुबमिनार पेक्षाही अधिक उंचीवर आहे.

या मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा १२.७ किमीचा आहे. चिनाब पूल वादळी वारे आणि भूकंपात सुद्धा सुरक्षित राहील याची ग्वाही दिली गेली आहे. पुलाच्या खालच्या कमानीचे जोडकाम पूर्ण झाल्यावर, ‘छात्रपती शिवाजी महाराज की जय’ आणि ‘बोले सो निहाल, सत श्री अकाल’ अश्या घोषणांनी हा परिसर दुमदुमून गेला होता.

या पुलाचे आयुष्य किमान १२० वर्षे असेल असे सांगितले जात आहे. काम पूर्ण झाल्यावर येथून प्रवासी गाड्या तसेच सैनिकांच्या स्पेशल गाड्या सुद्धा वेगाने प्रवास करू शकणार आहेत.