सोशल मीडियावर जसप्रीतने शेअर केले लग्नातील फोटो


भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. स्टार अॅंकर आणि मॉडेल संजना गणेशनशी त्याचे नाव जोडले जात होते. अखेर जसप्रीतने आज सोशल मीडियावर लग्नातील फोटो शेअर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन जसप्रीतने लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करत, आम्ही आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. आजचा दिवस हा आमच्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक आहे. आम्ही लग्न केले हे सांगताना आम्हाला आनंद होत असल्याचे कॅप्शन त्याने फोटोला दिले आहे.

जसप्रीतने शेअर केलेल्या फोटोंमध्ये संजनाने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला आहे. तर जसप्रीतने फिकट गुलाबी रंगाचा पेहराव केला आहे. या फोटोमध्ये दोघेही अतिशय आनंदी दिसत आहेत. जसप्रीतने शेअर केलेल्या या फोटोवर कृणाल पांडे, श्रेयस अय्यर, शिखर धवन आणि चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

अहमदाबादमध्ये झालेल्या इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या व अखेरची कसोटी भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळला नाही. तो का खेळला नाही? असा प्रश्न अनेकांना पडला होता. पण त्यामागील कारण आता समोर आले आहे. लग्नातील फोटो शेअर करत जसप्रीतने चाहत्यांना क्लीन बोल्ड केले आहे.

‘स्प्लिट्स व्हिला ७’ या रिअॅलिटी शोमध्ये संजना गणेशन दिसली होती. तिला या शोने लोकप्रियता मिळवून दिली होती. टीव्ही प्रेझेंटर होण्याआधी संजना एक मॉडल होती. संजनाने ‘फेमिना ऑफिशियली गॉर्जियस’ हा किताब जिंकला होता. त्यानंतर २०१२ मध्ये तिने ‘फेमिना स्टाइल दिवा’मध्ये भाग घेतला होता. २०१४ मध्ये संजना ‘फेमिना मिस इंडिया पुणे’ या स्पर्धेची फायनलिस्ट ठरली होती. संजनाने २०१९मध्ये क्रिकेट विश्वचषकात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर ‘मॅच पॉईंट’ शोचे सुत्रसंचालन केले होते.