कृष्णासोबतच्या वादावर गोविंदाने केले भाष्य


बॉलीवूड अभिनेते गोविंदा आणि त्यांचा भाचा कृष्णा अभिषेक ही जोडी सगळ्यांच्या परिचयाची आहे. पण सध्या त्यांच्यात धूसफुस सुरु असल्याचे दिसून येत आहे. गोविंदा काही दिवांपूर्वी ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमात पाहुणा म्हणून येणार होता. पण असे कळते की, कृष्णाने त्या दिवशी सेटवर यायला नकार दिला होता. सध्या दोघेही कोणत्या कार्यक्रमामध्ये किंवा बाहेरही एकत्र दिसत नाहीत. गोविंदाने अशातच दोघांच्या नात्यावर केलेले भाष्य सूचक आहे.

गोविंदाला टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना विचारण्यात आले की, अनेक कॉमेडी शोजमध्ये कृष्णा कायम त्यांची थट्टा का करत असतो? त्यावर गोविंदा यांनी कृष्णा असा का वागतो माहित नाही, पण त्याला कोणीतरी हे करण्यासाठी भाग पाडत असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले, कृष्णा तसा चांगला मुलगा आहे. पण तो आता फक्त माझी थट्टा करत नसून तो माझी प्रतिमा मलिन करत आहे. याच्या पाठीमागे जो कोणी आहे, त्याला हे करताना आपण पाहत आहोत.

आश्चर्य व्यक्त करत गोविंदा यांनी म्हटले आहे की, कृष्णाच्या करिअरला पाठिंबा दिल्याची शिक्षा त्यांना मिळत आहे का? ते म्हणाले, नेपोटिझमचा सामना मीही केला आहे. एक वेळ अशी आली होती की मला काम मिळणे बंद झाले होते. अमिताभ बच्चन यांचाही संघर्ष मी पाहिलेला आहे. ते ज्यावेळी स्टेजवर येत, त्यावेळी आजूबाजूचे लोक दूर निघून जात होते. मला कळत नाही, त्याला पाठिंबा दिल्याची शिक्षा मला मिळत आहे का? त्यांनी त्याला सोडले आहे, पण मला पकडले आहे.