विदर्भातील सात जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप; आठवड्याभरात २६ हजार रुग्णांची नोंद


मुंबई – विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली हे तीन जिल्हे वगळले इतर सात जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मागील आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार ७ ते १३ मार्च २०२१ या कालावधीत विदर्भात कोरोनाचे २६ हजार ५७१ नवीन रुग्ण आढळले. त्यातील ११ हजार ७९२ रुग्ण (४४.३७ टक्के) हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत.

विदर्भाच्या अकरा जिल्ह्यात ७ मार्चला ३ हजार ३४६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर ८ मार्चला २ हजार ८३०, ९ मार्चला ३ हजार २७६, १० मार्चला ३ हजार ९३४, ११ मार्चला ४ हजार ५१४, १२ मार्चला ४ हजार २३५, १३ मार्चला ४ हजार ४३६ रुग्ण आढळले. कोरोनाबाधित वाढत असल्यामुळे प्रशासन रुग्ण नियंत्रणात अपयशी ठरल्याचे दिसत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढीव संख्येमुळे नागपूर जिल्ह्यात प्रशासनाने कडक टाळेबंदी जाहीर केली आहे. तर अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशीम, बुलढाणा येथेही निर्बंध कडक केले आहे. त्यातच सात दिवसांत विदर्भातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपूर जिल्ह्यात (११,७९२ रुग्ण) आढळले आहेत.

बुलढाणा जिल्ह्याचा दुसऱ्या क्रमांकावर समावेश आहे. सात दिवसांत येथे ३ हजार ५४४ रुग्ण आढळले. तिसऱ्या क्रमांकावर अमरावती ३ हजार ३६, चौथ्या क्रमांकावर यवतमाळ २ हजार २९२, पाचव्या क्रमांकावर अकोला २ हजार २८२ रुग्ण आढळले आहेत. वाशीममध्येही १ हजार ८१, वर्धा १ हजार ३०६, चंद्रपूरला ३४४, गडचिरोलीत १९२, गोंदियात १३५, भंडारा जिल्ह्यात ३६७ रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात दैनिक कोरोनाबाधितांची संख्या पूर्वी दोन आकडी संख्येत म्हणजे ९६ रुग्णांपर्यंत आली होती. परंतु तेथेही १३ मार्चला १०४ रुग्ण (तीन आकडी संख्या) आढळल्याने चिंता वाढली आहे.

विदर्भातील नागपूर जिल्ह्यात मागील सात दिवसांत सर्वाधिक ६४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात जिल्ह्याच्या बाहेरून नागपुरातील विविध रुग्णालयांत दगावलेल्या काही रुग्णांचाही समावेश आहे. त्यानंतर अमरावतीत ३८, वर्धा २६, यवतमाळ २६, अकोला १७, बुलढाणा १७, वाशीम २, चंद्रपूर २, गोंदिया १, भंडारा १ रुग्णाचा मृत्यू झाला. सर्वात कमी रुग्ण असलेल्या गडचिरोलीत एकही मृत्यू झाला नाही. त्यातच वर्धा जिल्ह्यात सात दिवसांत नवीन रुग्णांच्या तुलनेत जास्त मृत्यू दिसत असल्याने चिंता वाढली आहे.