तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशा प्रकारे होते हेरगिरी

डिजिटल युगात स्मार्टफोन ही आजची मुख्य गरज बनली आहे आणि त्यामुळे स्मार्टफोन हॅक करून तुमची माहिती मिळविली जात असल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहेत. याचे मुख्य कारण सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहेत. स्मार्टफोन मुळे अनेक कामे सोपी आणि सहज होतात हे खरे असले तरी तुमचा स्मार्टफोनच तुमची हेरगिरी करणारा सर्वात मोठा हेर आहे हे नाकारता येत नाही.

तुमच्या फोन मध्ये जी अॅप्स असतात त्या अॅप्सचा डेव्हलपर तुमच्या फोनवर सहज नजर ठेऊ शकतो याची माहिती सर्वसामान्य लोकांना नसते. व्हॉटसअप सुद्धा आता सुरक्षित म्हणता येत नाही कारण अमेझॉनचे प्रमुख जेफ बेजोस यांचे व्हॉटसअप सुद्धा नुकतेच हॅक केले गेले आहे. मग सर्वसामान्य युजरची बात न केलेलीच बरे. शेवटी फोन मध्ये ही हेरगिरी करणारी सॉफ्टवेअर येतात कशी हे समजून घेणे म्हणून महत्वाचे ठरते.

पिगासस हे अश्या स्पाय सोफ्टवेअरमधील मोठे नाव आहे. ज्या कंपन्याचा त्यांचे फोन हॅकप्रूफ आहेत असा दावा आहे ते फोन सुद्धा याने हॅक केले आहेत. युजर्सना काहीही पत्ता लागू न देता अशी सोफ्टवेअर तुमची गुप्त माहिती चोरत असतात आणि हॅकर्स पर्यंत पोहोचवित असतात. तुमच्या फोन मध्ये असे हेरगिरी करणारे अॅप आहे का याचा शोध घेणेही अवघड असते.

२०१९ मध्ये पिगाससने जगातील १४०० पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर स्मार्टफोनच्या सहाय्याने हेरगिरी केली होती. बहुतेक वेळा लिंकच्या माध्यमातून इंस्टॉल थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून अशी हेरगिरी करणारी सोफ्टवेअर स्मार्टफोन मध्ये येत असतात. एखादी संदिग्ध लिंक तुम्ही क्लिक केली तर हा धोका वाढतो. काही लिंक खाली अॅग्री बटण दाबा असे येते हे बटण दाबले तरी हा धोका निर्माण होतो. गेमिंग सोफ्टवेअर, पोर्न साईट्स ही अशी हेरगिरी अॅप फोन मध्ये येण्याची आणखी काही ठिकाणे.

तुमचा फोन वारंवार क्रॅश होत असले, अॅप वारंवार हँग होत असेल तर तुम्ही सावध होणे आवश्यक आहे. ज्या बाबत तुम्हाला काहीच माहिती नाही असा एखादा फोल्डर दिसला तरी सावध होणे गरजेचे आहे. तुमच्या फोन मध्ये तुम्ही लोड न करताही एखादे संशयास्पद अॅप इन्स्टॉल झाले असेल तर प्रथम फोनचे इंटरनेट कनेक्शन बंद करून अॅप डेटा क्लिअर करावा आणि मगच ते अॅप डीलिट करावे असा सल्ला या क्षेत्रातील तज्ञ देतात. त्याचबरोबर दर सहा महिन्यांनी फोन पूर्ण फॉर्मेट करण्याची खबरदारी घेतली तर स्मार्टफोन द्वारे होणाऱ्या हेरगिरी पासून तुम्ही सुरक्षित राहण्याची शक्यता वाढते.