हॉलीवूड ही भारताच्या प्रेमात; शुटिंगसाठी पहिली पसंती भारताला
अमेरिकेची प्रसिद्ध चित्रनगरी हॉलीवूडला भारताची भुरळ पडली असून या आणि पुढील वर्षात अनेक नामवंत कंपन्यांनी भारतात शुटींगसाठी येण्याची तयारी केली आहे. भारतीय बाजाराची क्षमता लक्षात घेऊन हॉलीवूड भारताकडे आकर्षित झाल्याचे समजते. यात केवळ शुटींगच नाही तर भारतीय कलाकार सुद्धा दिसतील आणि चित्रपटातील कॅरेक्टरना भारतीय नावे असतील असेही समजते. हा ट्रेंड अगोदरच सुरु झाला असून आता त्यात वेगाने वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत.
हॉलीवूड कडून शुटींग साठी काश्मीर, मुंबई, जयपूर, दिल्ली, कोलकाता, गोवा आणि मध्यप्रदेशाला प्रथम पसंती दिली जात आहे. अमेरिकेने करोनाचे खापर चीन वर फोडल्यापासून चीनी लोकांनी हॉलीवूड पासून फारकत घेतली असल्याचे दिसत आहे. मात्र याच करोना काळात टेनेट, वंडरवूमन या चित्रपटांनी भारतात रिलीज झाल्यावर उत्तम कमाई केली आहे. या काळात अमेरिकेतील थियेटर बंद होती. त्यामुळे भारतीय बाजाराची ताकद हॉलीवूडच्या लक्षात आली आहे.
हॉलीवूडच्या २०१९ च्या एकूण कमाईत ७० टक्के कमाई परदेशातून झाली आहे. त्यात चीनचा बाजार हिस्सा ५० टक्के होता. पण आता चीनने पाठ फिरवल्यावर हॉलीवूड भारताकडे वळले आहे. बहुभाषी भारतीय भाषांसाठी डबिंगचे बजेट हॉलीवूडने वाढविले असून प्रादेशिक भाषांत डबिंग केले जाणार आहे. वॉर्नर ब्रदर्स कंपनी दरवर्षी १०० चित्रपट बनविते. त्यांनी पुढील वर्षात भारतात शुटींगची योजना आखली आहे. भारतीय चित्रपट उद्योगाचे वार्षिक बजेट २७ हजार कोटी म्हणजे ४ अब्ज डॉलर्स आहे.