महाप्रचंड मोटेरा थाळीत घ्या कोहली खमण, धोनी खिचडीचा आस्वाद

हॉटेल्स, रेस्टोरंट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळया थीम्स सादर करतात. मेन्यू कार्ड मध्ये सतत नाविन्य असेल याची दक्षता घेतात. देशात सध्या इंग्लंड- भारत यांच्यात क्रिकेट सामने सुरु आहेत आणि पुढील महिन्यापासून आयपीएलचा थरार अनुभवता येणार आहे. या क्रिकेट फिव्हरला अनुसरून अहमदाबादच्या मॅरीयटच्या कोर्ट यार्डने क्रिकेट रास उत्सव सुरु केला असून महाप्रचंड पाच फुटी थाळी सादर केली आहे. या थाळीचे नामकरण मोटेरा स्टेडियम म्हणजे आता मोदी स्टेडियम वरून ‘मोटेरा थाळी’ असे केले गेले आहे.

या थाळीत क्रिकेटपटूंच्या नावावरून अनेक पदार्थ आहेत. अनेक खेळाडूंनी या थाळीची तारीफ केली असून पार्थिव पटेलने त्याच्या मित्रासह या थाळीचा आस्वाद घेतला आहे. पदार्थाच्या यादीत कोहली खमण, पांड्या पात्रा, धोनी खिचडी, भुवनेश्वर भरीत, रोहित आलू रसिला, शार्दुल श्रीखंड, बाउंसर बासुंदी, हॅट्रीक गुजराथी दाल, बूमराह भिंडी, हरभजन हांडवो असे अनेक पदार्थ आणि अन्य अनेक चविष्ट स्नॅक्स, अॅपीटायझर्स, डेझर्ट आहेत.

मार्च ८ आणि ९ तारखेला येथे चॅलेंज प्रोग्राम झाला. त्यात एका तासात ही संपूर्ण थाळी संपविण्याचे आव्हान दिले गेले होते. विशेष म्हणजे चार जणांना मिळून ही थाळी संपविता येणार होती. हे आव्हान कुणी जिंकले ते समजू शकलेले नाही.