अन् धोनी झाला संन्यासी…!


आयपीएल संग्रामाला आता महिन्याचा अवधी उरला असताना यात सामील टीम पैकी फक्त चेन्नई सुपरकिंग अशी एकमेव टीम बनली आहे जिने कप्तानाच्या उपस्थितीत जोरदार सराव सुरु केला आहे. त्याच दरम्यान टीमचा कप्तान महेंद्रसिंग धोनी याचा एक फोटो व्हायरल झाला असून त्याने सगळ्यांचा बुचकळ्यात पाडले आहे. तसे पाहिले तर धोनीचा नेटमध्ये सर्व करतानाच एक व्हिडीओ नुकताच शेअर केला गेला आहे. पण या फोटोची चर्चा त्यापेक्षा वेगाने होत असल्याचे दिसून आले आहे.

या फोटोमध्ये धोनी डोके मुंडण केलेल्या अवस्थेत बौध्द भिक्षुच्या रुपात एका जंगलात बसलेला दिसत आहे. स्टार स्पोर्ट्सने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा फोटो शेअर केल्याने धोनीने क्रिकेट संन्यासच नाही तर खराखुरा संन्यास घेतला का याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र हा एखाद्या जाहिरातीचा भाग असून शकतो असे सांगितले जात आहे. पण धोनीने खरोखरीच मुंडण केले आहे काय याबाबत त्याच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.

करोनानंतर प्रथमच देशात आयपीएलचे आयोजन केले गेले असून ९ एप्रिल रोजी गतवर्षीचे विजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगलोर यांच्यात पहिला सामना चेन्नईमध्ये होणार आहे तर १० एप्रिल रोजी चेनई सुपरकिंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे.