मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन मंजूर


पुणे : न्यायालयाने समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असून पुणे महानगरपालिकने कोंढव्यात हज हाऊस बनविण्याचे काम सुरु केले होते. याच धार्मिक स्थळाला विरोध करत दंगल भडकवणारे भाषण तसेच धार्मिक भावना दुखावणारी एकबोटेंची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यांच्याविरोधात कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने शुक्रवारी त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

एकबोटे प्रकरणी संभाजी ब्रिगेडने फिर्याद दिली होती. अतिरिक्त सत्र न्यायाधीश जी.पी. अग्रवाल यांच्या न्यायालयाने एकबोटेंना हा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अॅड. एस.के. जैन आणि अॅड. अमोल डांगे यांनी एकबोटेंच्या जामीनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

एकबोटेंच्या विरोधात शाहाफाजिल सिद्धीकी आणि सतिश काळे यांनी फिर्याद दाखल केली होती. एकबोटेंनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मुळात या प्रकरणी उशीरा एफआयआर दाखल करण्यात आला आहे, असा युक्तीवाद अॅड. डांगे आणि अॅड जैन यांनी केला.

सिव्हिल आणि कल्चर सेंटरच्या नावाखाली हज हाऊसची बांधणी करण्यात येत आहे. संबंधित जागा पुणे महानगरपालिकेच्या ताब्यातील आहे आणि अर्जदारही पोलीस तपासाला सहकार्य करत असल्याचे अर्जदारांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले. तसंच या प्रकरणात पोलीस कोठडीतील चौकशीची गरज नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिले.

त्यानुसार मिलिंद एकबोटेंचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने मंजूर करावा. पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. अर्जदाराने साक्षीपुराव्यात हस्तक्षेप करु नये, या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला.