.इंग्लंड विरुध्द सामना हरला तरी विराटने केले हे रेकॉर्ड

इंग्लंड विरुद्ध टी २० मालिकेच्या पाच सामन्यातील पहिला सामना भारताने गमावला असला तरी टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली याने मात्र आणखी एक रेकॉर्ड नोंदविले आहे. आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर औट होण्याचे रेकॉर्ड विराटच्या नावावर नोंदविले गेले असून तो ही कामगिरी करणारा पाहिला भारतीय कप्तान बनला आहे.

विराट आंतरराष्ट्रीय टी २० मध्ये तीन वेळा शून्यावर आउट झाला आहे. प्रथम ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१७ मध्ये तो जेसन बेहार्नडोर्फच्या गोलंदाजीवर शून्यावर औट झाला होता. २०१८ मध्ये आयर्लंड विरुध्द खेळताना त्याला पिटर चेजने शून्यावर औट केले होते आणि आता २०२१ मध्ये आदिल रशीदने त्याला शून्यावर औट केले आहे.

एकूण सर्वप्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांचा विचार केला तर सर्वाधिक वेळा शून्यावर औट होण्याचे रेकॉर्ड भारतीय कप्तान सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. तो १३ वेळा शून्यावर औट झाला आहे. विराटने हे रेकॉर्ड सुद्धा मोडले असून तो १४ वेळा शून्यावर औट झाला आहे. शिवाय सलग दोन वेळा शून्यावर औट होण्याचा पराक्रम सुद्धा विराटने नोंदविला आहे. इंग्लंड विरुद्ध शेवटच्या कसोटीत तो शून्यावर औट झाला होता आणि त्या पाठोपाठ पहिल्या टी २० मध्ये सुद्धा शून्यावर औट झाला आहे.