टेस्ला चार्जिग स्टेशनसाठी टाटा पॉवरच्या संपर्कात

टेस्ला मोटर्सने भारतात प्रवेशाची तयारी वेगाने सुरु केली असून मिडिया रिपोर्ट नुसार टाटा सन्सची उपकंपनी टाटा पॉवर्स बरोबर देशात इलेक्ट्रिक पायाभूत सुविधा म्हणजे कार चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सहकार्य करार करण्यासंदर्भात बोलणी सुरु केली आहेत. ही बोलणी अजून प्राथमिक पातळीवर आहेत तरीही टाटा पॉवरच्या शेअरमध्ये त्यामुळे ५.५ टक्के वाढ झाली आहे.

काही दिवसांपूर्वी इलेक्ट्रिक कारसाठी टाटा मोटर्स आणि टेस्ला यांच्यात भागीदारी झाल्याची वार्ता आली होती. टाटा मोटर्स इलेक्ट्रिक मोबिलिटी या उपकंपनीची आणि टेस्लाची भागीदारी झाल्याचे चर्चिले जात होते. टाटा इलेक्ट्रिक मोबिलिटीने या संदर्भात एक पोस्ट टाकली होती आणि त्यात,’ आजकाल तेरे मेरे प्यार के चर्चे हर अखबार में, सबको मालूम है और सबको खबर हो गई’ अश्या ओळी होत्या आणि त्याखाली वेलकम टेस्ला, टेस्ला इंडिया हॅशटॅग होता. मात्र भागीदारीच्या अफवा उठू लागल्यावर ही पोस्ट डिलीट केली गेली.

टेस्ला भारतात त्यांचे लोकप्रिय मॉडेल ३ प्रथम सादर करणार असून कंपनीचे हे सर्वात स्वस्त मॉडेल आहे. ही कार भारतात असेम्बल केली जाणार आहे. तिला फुलचार्ज होण्यासाठी फक्त १५ मिनिटे लागतात आणि एका चार्ज मध्ये ती ५००किमी धावू शकते. ही कार भारतात ४० ते ५५ लाख रूपयात मिळेल असे सांगितले जात आहे.