इतकी आहे ममतादीदींची संपत्ती

नंदीग्राम मधून विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्या ममता बॅनर्जी यांची एकूण संपत्ती फक्त १६.७२ लाख एवढीच आहे. प.बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज नंदीग्राम विधानसभा क्षेत्रातून १० मार्च रोजी भरला आहे. निवडणूक अर्जात निवडणूक आयोगाला उमेदवाराच्या संपत्तीची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानुसार ममता दिदींनी भरलेल्या अर्जात संपत्तीचा तपशील दिला आहे.  ममता दिदींच्या नावावर एकही घर, गाडी अथवा जमीन नाही. तसेच त्यांच्या विरोधात एकही गुन्हेगारी केस दाखल नाही असेही या अर्जात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या वेळी म्हणजे २०१६ मध्ये जेव्हा ममता दिदींनी निवडणूक लढविली होती तेव्हा त्यांची संपत्ती ३०. ४५ लाख होती ती आता १६.७२ लाखवर आली आहे. २०१९-२० मध्ये दीदींची एकूण कमाई १०,३४,३७० रुपये होती. त्यांच्या बँकेत १३.५३ लाख रुपये आहेत आणि रोख रक्कम आहे ६९२५५ रुपये. यात त्यांचा १.५१ लाखच निवडणूक खर्च समाविष्ट आहे.

ममता दीदी पुस्तके लिहितात त्यासाठी त्यांना ९३० रुपये रॉयल्टी मिळते. २०१९-२० मध्ये त्यांनी १.८५ लाख टीडीएस भरला आहे. त्यांच्या कडे फक्त ९ ग्रॅम सोने आहे. बंगाल मध्ये २९४ विधानसभेच्या जागांसाठी ८ टप्प्यात मतदान होणार आहे. पाहिले मतदान २७ मार्च रोजी असून त्यात नंदीग्राम विधानसभा जागेचा समावेश आहे. येथे ममतांच्या विरोधात त्यांचेच एके काळाचे सहकारी आणि आता भाजपाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी रिंगणात आहेत.