जेफ बेजोस, एलन मस्कना मागे टाकून अदानींनी केली सर्वाधिक वार्षिक कमाई

२०२० या वर्षात भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीत प्रचंड वेगाने वाढ झाली असल्याचा रिपोर्ट आहे. आत्तापर्यंत गौतम अदानी यांनी अमेझॉनचे प्रमुख आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत जेफ बेजोस आणि टेस्ला प्रमुख एलोन मस्क यांना मागे टाकून वर्षात सर्वाधिक कमाई केली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत रिलायंसचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनाही अदानी यांनी या बाबतीत मागे टाकले आहे.

ब्लूमबर्ग इंडेक्स नुसार अदानी यांनी एका वर्षात १६.२ अब्ज डॉलर्स कमाई केली असून त्यांची एकूण संपत्ती ५० अब्ज डॉलर्स झाली आहे. त्या तुलनेत मुकेश अंबानी यांची कमाई निम्मी म्हणजे ८.१ अब्ज डॉलर्स आहे. अदानी ग्रुपचे सर्व शेअर्स ५० टक्के तेजीत असून पोर्ट्स, एअरपोर्ट्स, डेटा सेंटर, कोळसा खाणी असा अदानी यांचा व्यवसाय विस्तार आहे. गेल्या महिन्यात अदानी एन्टरप्राईजेस लिमिटेडने भारतात १ गिगावॉट क्षमतेचे डेटा सेंटर तयार करण्यासंदर्भात करार केला आहे.

अदानी गॅस लिमिटेडच्या शेअरमध्ये ९६ टक्के, अदानी एंटरप्रायजेस शेअर्स मध्ये ९० टक्के, अदानी ट्रान्समिशन लिमिटेड मध्ये ७९ टक्के, अदानी पॉवर आणि पोर्ट शेअर ५२ टक्के वाढले आहेत. अदानी ग्रीन शेअर मध्ये १२ टक्के तेजी आली आहे मात्र गेल्या वर्षात या शेअरमध्ये ५०० टक्के वाढ नोंदविली गेली होती असे समजते.