Zomatoच्या डिलीव्हरी बॉयने केला महिलेनेच चप्पलने मारहाण केल्याचा दावा


बंगळुरु: झोमॅटो या खाद्यपदार्थ सुविधा उपल्बध करुन देणाऱ्या अ‌ॅपवरुन जेवण ऑर्डर करुन ते रद्द केल्यामुळे डिलीव्हरी बॉयने चक्क महिलेला मारहाण केल्याचा दावा करणारा व्हिडीओ एका महिलने काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. त्या डिलीव्हरी बॉयला कर्नाटक पोलिसांनी अटक केली असून त्याला झोमॅटोने कामावरुन देखील काढून टाकले आहे. झोमॅटोच्या त्या डिलीव्हरी बॉयचे नाव कामराज असे असून त्याने याप्रकरणी वेगळाच दावा केला आहे. ऑर्डर पोहोचवण्यास उशीर झाल्याने सबंधित महिलेने शिवीगाळ करत चप्पलने मारहाण केल्याचा दावा डिलीव्हरी बॉयने केला आहे.

त्या महिलेच्या घरी पोहोचून ऑर्डर डिलीव्हर केली आणि पैसे मिळण्याची वाट पाहत होतो. संबंधित महिलेने कॅश ऑन डिलीव्हरी हा पर्याय स्वीकारला होता. ऑर्डर पोहोचवण्यासाठी उशीर झाल्याने त्या महिलेची माफी मागितली, तरी त्या रागावलेल्या होत्या, असे डिलीव्हरी बॉय कामराजने सांगितले. ट्रॅफिक जास्त आणि रस्ता खराब असल्यामुळे पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगितले.

पण सदर महिलेने पार्सल घेतल्यानंतर पैसे देण्यास नकार दिला होता आणि त्या झोमॅटो कस्टमर केअरशी बोलत होत्या. कामराजने सांगितले की, त्या महिलेने झोमॅटो कस्टमर केअरशी बोलून ऑर्डर रद्द केली. ऑर्डर रद्द केल्यानंतर ती ऑर्डर परत देण्यासही त्यांनी नकार दिल्यानतर बिल्डींगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या महिलेने मला चप्पलने मारहाण केली आणि स्वत:च्या अंगठीने नाकावर फटका मारुन घेत स्वतःला जखम केली. कामराज यानं ही बाजू द न्यूज मायन्यूट यापोर्टलशी बोलताना मांडली आहे.

झोमॅटो या अ‌ॅपवरुन बंगळुरुमध्ये संबंधित महिलेने जेवण ऑर्डर केले होते. जेवणाची ऑर्डर निश्चित वेळेत न आल्यामुळे महिलेने झोमॅटोच्या कस्टमर केअरमध्ये फोन केले. तसेच ऑर्डर वेळेवर न आल्यामुळे या महिलेने मागवलेल्या जेवणाची ऑर्डर कॅन्सल केली. जेव्हा झोमॅटोच्या कस्टमर केअरशी ही महिला बोलत होती, त्याच वेळात एक डिलीव्हरी बॉय जेवण द्यायला आला. हे जेवण घेण्यास महिलने नकार दिला. ऑर्डर केलेले जेवण नाकारल्यामुळे या महिलेवर डिलीव्हरी बॉय चिडला. त्याने महिलेशी हुज्जत घालणे सुरु केले. डिलीव्हरी बॉयने मागवलेले जेवण महिलेच्या घरात घुसून ठेवून दिले. या प्रकाराचा महिलेने विरोध केल्यामुळे रागात येऊन डिलीव्हरी बॉयने महिलेच्या नाकावर मारले. या हल्ल्यात महिलेच्या नाकाला जबर मार लागला आणि तिच्या नाकातून रक्त येऊ लागले, असा दावा त्या महिलेने केला आहे.