१ ली ते ११ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविनाच पास करण्याचा या सरकारने घेतला निर्णय


पुद्दुचेरी – देशभरातील अनेक भागांमध्ये शाळा आणि महाविद्यालये कोरोना काळात ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. काही भागात तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑनलाईन झाल्या आहेत. तर काही ठिकाणी प्रत्यक्ष म्हणजेच ऑफलाईन परीक्षा घेण्यात आल्या. पण पुद्दुचेरीमध्ये वेगळेच चित्र दिसत आहे. यंदाच्या वर्षी इयत्ता १ली ते इयत्ता ११वी अशा सर्वच विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे.

पुद्दुचेरी प्रशासनाकडून १ ली ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भात प्रस्ताव पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांना पाठवला होता. आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर त्यावर उमठल्यामुळे पुद्दुचेरीच्या विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्काच ठरला आहे.

तमिळनाडूचे मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांनी काही दिवसांपूर्वी राज्यातील ९वी, १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवायच उत्तीर्ण करण्याचा निर्णय जाहीर केला. सहामाही आणि तिमाही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे त्यांना गुण देऊन पास केलं जाणार आहे. पण १०वीच्या विद्यार्थ्यांना यावेळी थेट पास करणे चुकीचे ठरेल, अशी टीका देखील करण्यात आली होती.

पण, पुद्दुचेरीमधील १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना देखील आता याच निर्णयाच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्याचबरोबर पुद्दुचेरीतील १ली ते ९वीच्या विद्यार्थ्यांना देखील थेट उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, ३१ मार्चपर्यंत शाळेच्या तासिकांना या विद्यार्थ्यांना नियमितपणे हजर राहावे लागणार आहे. ५ दिवसांचा आठवडा आणि शनिवार-रविवार सुट्टी असे या विद्यार्थ्यांचे वेळापत्रक असेल. या विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या १ एप्रिलपासून सुरू होतील. १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग परीक्षेच्या वेळापत्रकाप्रमाणे भरवले जातील, असे देखील पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.