नसबंदी केल्यानंतरही गरोदर राहिलेल्या महिलेने मागितली 11 लाखांची नुकसान भरपाई


पटना – एक विचित्र घटना बिहारमध्ये घडली असून नसबंदी केल्यानंतरही एक महिला गरोदर राहिली आहे. पीडित महिलेने या प्रकरणी ग्राहक न्यायालयात धाव घेतली असून तिने 11 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

फुलकुमारी ही महिला बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये राहते. या महिलेला आधी चार मुले आहेत. घरात गरीबी असून चार मुलांचे पालन पोषण करणे कुटुंबियांसाठी कठीण होत आहे. फुलकुमारी यांनी 29 जुलै 2019 रोजी सरकारी रुग्णालयात जाऊन नसबंदी केली होती.

पण फुलकुमारी दोन वर्षानंतर पुन्हा गरोदर राहिल्या आहेत. फुलकुमारी यांनी या प्रकरणी डॉक्टरांच्या विरोधात तक्रार केली आहे. तसेच नुकसान भरपाई म्हणून 11 लाख रुपयांची मागणी केली आहे.

तर दुसरीकडे अशा प्रकारची एखादी शस्त्रक्रिया अयशस्वी होत असल्याची प्रतिक्रिया रुग्णालयाने दिली आहे. तसेच शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्यानंतर सदर व्यक्तीला 30 हजार रुपयांची नुकसानभरपाई दिली जाते. फुलकुमारी यांच्याकडून फॉर्म भरून घेतला असून त्यांना 30 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जाईल, असे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.