महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे राज्यातील जनतेला नुसता त्रास – नितेश राणे


सिंधुदुर्ग : राज्य सरकारने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे १४ मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा गुरुवारी रद्द केल्याची घोषणा केल्यानंतर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. आता २१ मार्च रोजी ही परीक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आश्वासनानंतर होणार आहे. यातच आता भाजप आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला असून, या सरकारचा राज्यातील जनतेला त्रास झाल्याची टीका त्यांनी केली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला परीक्षा पुढे ढकलायची होती, तर मग हॉल तिकिटे का म्हणून काढली? सरकार विद्यार्थ्यांचे झालेले नुकसान भरून देणार का?, अशी विचारणा नितेश राणे यांनी केली. विद्यार्थ्यांचे आर्थिक नियोजन परीक्षा पुढे गेल्यामुळे बिघडले आहे. याची नुकसान भरपाई महाविकास आघाडी सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे.

भ्रष्टाचार जेव्हा करायचा असतो. टेंडर पास करायचे असते, तेव्हा सरकारमधील लोकांचा ताळमेळ चांगला असतो. विद्यार्थ्यांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे सरकार म्हणजे राज्यातील जनतेला नुसता त्रास झाला आहे, अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केली.

अँटिलियाच्या बाहेर नेमके काय झाले, हे आपल्याला खरेच जाणून घ्यायचे असेल, तर सचिन वाझेंची चौकशी झाली पाहिजे. त्यांना अटक झालीच पाहिजे. हे प्रकरण अतिरेकी प्रकरण आहे की, खंडणीचा विषय आहे हे बाहेर यायला हवे, असे नितेश राणे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे परीक्षा पुढे ढकलल्यामुळे नुकसान झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी सरकारने तरतूद करावी. त्यांच्या राहण्याची व्यवस्था सरकारने करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली. तसेच नवीन जाहीर केलेल्या तारखेला म्हणजेच २१ मार्च रोजी परीक्षा झाली नाही, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.