स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या उत्सवाची आजपासून सुरुवात


नवी दिल्ली: आजपासून देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची म्हणजेच 75व्या वर्षाच्या उत्सवाची सुरुवात होणार आहे. या उत्सवाचे सेलिब्रेशन करण्यासाठी देशभरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ सुरु करण्यात येणार आहे. या अंतर्गत दांडी मार्चचे आयोजन केले जाणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी या दांडी मार्चला गुजरातच्या अहमदाबादमध्ये हिरवा झेंडा दाखवणार आहेत. दांडी पुलावरुन प्रतिकात्मक दांडी यात्रेमध्येही पंतप्रधान मोदी सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी देखील असणार आहेत.

वेगवेगळ्या 75 ठिकाणी अमृत महोत्सवानिमित्त समारंभ होणार असून भाजपच्या खासदारांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी भाजपच्या संसदीय पक्षाच्या बुधवारी झालेल्या बैठकीतही केले होते. काही कार्यक्रम पुढील 75 आठवड्यासाठी तयार असल्याचे आणि काही कार्यक्रम लोकांच्या सल्ल्यानुसार या महोत्सवाच्या अंतर्गत केले जाणार आहेत.

देशभरात ‘आजादी का अमृत महोत्सव’ साजरा होणार आहे. यात सायकल आणि बाईक रॅली, विविध स्पर्धा, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आणि ‘आत्मानिर्भर भारत’ या विषयांवर कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. हा अमृत महोत्सव साजरा करण्यामागचे उद्दीष्ट म्हणजे मुले, तरुण आणि नागरिकांचा यात जास्तीत जास्त सहभाग होणे आणि महात्मा गांधींचा संदेश पोहोचविणे हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साबरमती गांधी आश्रमातून ऐतिहासिक दांडी यात्रेच्या पुनर्रचनेला झेंडा दाखवणार आहेत. 81 पादचारी या दांडी यात्रेत साबरमती आश्रमापासून 386 कि.मी. अंतरावर असलेल्या समुद्र किनाऱ्यावरील दांडी या ठिकाणी जाणार आहेत.