कंगना राणावतच्या विरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केली नवी तक्रार


मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत नेहमीच चर्चेत असते. बॉलिवूडमधील घराणेशाही ते देशभरातील राजकारण अशा विविध विषयांवर ती रोखठोकपणे प्रतिक्रिया देते. या स्वभावामुळे तिला अनेकदा ट्रोल देखील केले जाते. पुन्हा एकदा असाच काहीसा प्रकार घडला आहे. तिने अलिकडेच काश्मिर पंडितांवर चित्रपट तयार करण्याची घोषणा केली होती. पण या चित्रपटामुळेचं ती अडचणीत सापडली आहे.

कंगनानं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाद्वारे आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. “डिडा द वाँरियर किंग” असे या चित्रपटाचे नाव असेल असे ती म्हणाली होती. मात्र या चित्रपटाच्या पटकथेवर एका लेखकानं आक्षेप घेतला आहे. पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार ही पटकथा ‘कश्मिर की योद्धा रानी डिडा’ या पुस्तकातून चोरल्याचा आरोप त्याने केला आहे. शिवाय कंगनाविरोधात त्यानं कॉपीराईट अंतर्गत पोलीस तक्रार देखील दाखल केली आहे. या प्रकरणामुळं कंगना आता आणखी अडचणीत येण्याची शक्याता वर्तवण्यात येत आहे.

प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी देखील यापूर्वी कंगनाविरोधात न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे अख्तर यांनी बदनामी झाल्याची तक्रार केली होती. कंगनावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो, असे अख्तर यांच्या तक्रारीवर अहवाल सादर करताना पोलिसांनी म्हटले होते. न्यायालयाने त्यानंतर कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण ती हजर न झाल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात टक वॉरंट बजावले. आता कंगनाने देखील अंधेरी महानगर दंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे.