आज जाहिर होणार महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेची तारीख – उद्धव ठाकरे


मुंबई, : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून 14 तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख आजच घोषित केली जाईल, अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. तसेच परीक्षा पुढे ढकलल्याने कोणत्याही विद्यार्थ्यांचे वयोमर्यादेमुळे नुकसान होणार नाही हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

काल समाज माध्यमांद्वारे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला संबोधित केले त्यावेळी ते बोलत होते. यासंदर्भात मुख्य सचिव तसेच आयोगाच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले असल्याचे सांगतांना मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन केवळ काही दिवसांसाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे. विद्यार्थी ज्या ठिकाणी परीक्षा देणार आहेत ती परीक्षा स्थळे, परीक्षा घेणारा कर्मचारी वर्ग सुरक्षित आहे का हे पाहणे आवश्यक आहे.

जे कर्मचारी पेपर वाटणार, पर्यवेक्षण करणार किंवा परीक्षा घेणार त्या कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट झाली आहे का, त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे का, त्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे का या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांचे आरोग्य विषयक हित लक्षात घेऊन पाहणे महत्त्वाचे आहे. या सर्व कर्मचाऱ्यांच्या कोरोना टेस्ट करण्याच्या सुचना दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धात्मक परीक्षा देऊन राज्य शासनाच्या सेवेत दाखल होणाऱ्या युवकांच्या करिअरचा विषय युवकांप्रमाणे शासनासाठीही तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामुळे रस्त्यावर उतरू नका तुमचे करिअर आणि तुमची आरोग्य विषयक सुरक्षितता आमच्या सर्वांसाठीच महत्त्वाची आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांना कोरानाच्या दडपणाखाली येऊन परीक्षा द्यावी लागू नये हीच प्रामाणिक इच्छा असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्‍ट केले.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना कुठल्याही संभ्रमात न राहाता, भ्रामक विचारांना बळी न पडता संयम बाळगण्यास सांगितले तर विद्यार्थ्यांच्या भावनांशी आणि आरोग्याशी खेळू नका, असे मुख्यमंत्र्यांनी विरोधकांनाही आवाहन केले.