पहिल्या टी-२०मध्ये भारताचा इंग्लंडकडून दारुण पराभव


अहमदाबाद – साहेबांच्या संघाला कसोटी मालिकेमध्ये ३-१ ने हरवणाऱ्या टीम इंडियाकडून तमाम भारतीय क्रिकेट रसिकांना टी-२० मालिकेमध्ये देखील तशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा होती. पण, टी-२० मालिकेची सुरुवात भारतासाठी निराशाजनक झाली आहे. पहिल्याच टी-२० सामन्यामध्ये भारताला इंग्लंडकडून दारूण पराभव स्वीकारावा लागला आहे. विजयासाठी १२५ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी फक्त दोन विकेट्सच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. यामध्ये सलामीवीर जेसन रॉयने केलेल्या ३२ चेंडूत ४९ धावांचा मोठा वाटा होता. या खेळीमध्ये रॉयने ३ सणसणीत षटकार आणि ४ चौकार लगावले.

इंग्लंडला जेसन रॉय (४९) आणि जॉस बटलर (२८) या दोघांनी ७२ धावांची दणदणीत सलामी दिली आणि टीम इंडियाच्या हातून सामना निसटल्याचे स्पष्ट झाले. आपला १००वा सामना खेळणाऱ्या युजवेंद्र चहलने आठव्या षटकामध्ये जॉस बटलरला पायचीत करून टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यापाठोपाठ १२व्या षटकामध्ये वॉशिंग्टन सुंदरने आपल्या पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला पायचीत करून माघारी धाडले. तोपर्यंत या दोघांनी सामना इंग्लंडच्या खिशात आणून ठेवला होता.