मुंबई : राज्यावर ओढावलेले कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या रविवारी होणारी एमपीएससीकडून घेण्यात येणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर राज्यभरातील विद्यार्थ्यांचा या निर्णयाविरोधात संताप पाहायला मिळाला. आता परीक्षेची नवीन तारीख लोकसेवा आयोगाने जाहीर केली आहे.
अखेर तारीख ठरली ; 21 मार्चला एमपीएससीची परीक्षा, आयोगाकडून नवे वेळापत्रक जाहीर
लोकसेवा आयोगाने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार 21 मार्चनंतर होणाऱ्या परीक्षा या ठरलेल्या वेळेनुसारच होणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 27 मार्चला होणार आहे. तर 11 एप्रिलला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे.
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून वेगवेगळ्या जिल्ह्यांनी त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निर्बंध लावलेले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सेवा पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याने सदर परीक्षा पुढे ढकलण्यात येत असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परिपत्रक काढून म्हटले. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनमुळे एमपीएससीच्या परीक्षा मागील वर्षभरापासून रखडल्या आहेत. याआधी एप्रिल, सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती, ती पुढे लांबणीवर पडली होती. आता पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यातील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी आंदोलन केले. त्यानंतर राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले.