शिमगोत्सवासाठी मुंबईकर चाकरमान्यांना न येण्याचे आवाहन


रत्नागिरी – कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात वाढत असल्यामुळे रत्नागिरीमध्ये यंदाच्या शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी पूजेसाठी घरोघरी नेण्यावर जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. त्याचबरोबर, यंदा शक्यतो या उत्सवासाठी मुंबईसह बाहेरगावी असलेल्या चाकरमान्यांनी येऊ नये, असे आवाहन करण्यास प्रशासनाने सुचवलेले आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रामधून येणाऱ्या चाकरमान्यांना चाचणी बंधनकारक आहे.

कोकणात या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शिमगोत्सवाला प्रारंभ होणार आहे. कोकणवासियांच्या दृष्टीने गणपती एवढाच महत्त्वाचा असलेल्या या धार्मिक-सांस्कृतिक उत्सवाच्या काळात चाकरमानी आपापल्या गावी येऊन मोठ्या उत्साहाने सण साजरा करतात. त्याचप्रमाणे शिमग्यानंतर ग्रामदेवतेची पालखी घरोघरी जाते. तेथे अतिशय भक्तीभावाने पूजाअर्चा केली जाते. पण ग्रामस्थ उत्सव साजरा करण्याच्या या पद्धतीमध्ये मोठ्या संख्येने एकत्र येतात. त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने हा उत्सव साजरा करण्याबाबत निर्बंध जारी केले आहेत.

या संदर्भात गुरूवारी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी काढलेल्या आदेशानुसार गावातील मंदिराचे विश्वस्त आणि पालखीधारकांसाठी कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. ग्रामदेवतेच्या पालखीची रुपे लावणे, सजवण्याचा कार्यक्रम मोजक्या लोकांच्या उपस्थितीत करावयाचा असून पालखी परंपरेनुसार २५ ग्रामस्थ आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत भेट होईल.

एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पालखी शक्यतो वाहनातून नेणे अपेक्षित आहे. ते शक्य नसल्यास पालखीधारकांनी स्वतः वाहून न्यावी. पण पालखीबरोबर ५० पेक्षा जास्त लोकांनी जमू नये. ग्रामदेवतेची पालखी सालाबादप्रमाणे घरोघरी नेण्यास बंदी किंवा गर्दीमध्ये नाचवण्यास बंदी आहे. छोटया होळ्या आणून मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परंपरेनुसार होम करावा. गर्दी टाळण्यासाठी पालखी दर्शनाच्या वेळा निर्धारित करून घ्याव्यात.

होळी व पालखीची पूजा, नवस, पेढे, हार, नारळ आदी स्वीकारू नयेत आणि प्रसादाचे वाटप करू नये. सहाणेवर पालखी आणि होळीच्या दर्शनासाठी प्रत्येक वाडीतील, भागातील लोकांना स्वतंत्र दिवस नेमून द्यावा किंवा कालावधी निश्‍चित करावा, इत्यादी सूचना जिल्हा प्रशासनाने केल्या आहेत. तसेच हे सर्व करताना शारीरिक अंतर, मास्कचा वापर, थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझरची सुविधा बंधनकारक आहेत.

मुंबईसह बाहेरगावी असलेल्या चाकरमान्यांना शक्यतो गावी न येण्याचे आवाहन करावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून होळीच्या कार्यक्रमाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, फेसबुक, संकेतस्थळ इत्यादी माध्यमांद्वारे उपलब्ध करुन द्यावी, असे सुचवण्यात आले आहे.

मुंबई, पुणे किंवा अन्य भागातील प्रतिबंधित क्षेत्रामधून (कंटेन्मेंट झोन) रत्नागिरी जिल्ह्यात या सणासाठी येणाऱ्या नागरिकांकडे ७२ तासांपूर्वीची कोरोना चाचणी नकारात्मक असल्याचा अहवाल आवश्यक आहे. प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना नियमित चाचणी व थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक राहणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक व्यवस्था करण्याची जबाबदारी स्थानिक नागरी व ग्रामकृती दलांवर टाकण्यात आली आहे.