या महिन्यात वायुसेनेत दाखल होणार आणखी १७ राफेल

मार्च महिन्यात आणखी १७ राफेल लढाऊ विमाने भारताला मिळणार आहेत. यामुळे भारतीय वायुदलाची ताकद वाढणार असून ही विमाने प. बंगाल मधील हशिमारा एअरबेस वर तैनात केली जात आहेत. राफेल लढाऊ विमानांची ही दुसरी स्क्वाड्रन असून पहिली राफेल स्क्वाड्रन अंबाला हवाई तळावर तैनात केली गेली आहे. हशिमारा एअरबेस चीन- भूतान ट्रायजंक्शन जवळ आहे. भविष्यात चीन कडून काही आगळीक केली गेली तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी ही विमाने सज्ज आहेत.

राफेल लढाऊ विमानाची पहिली खेप २९ जुलै रोजी भारतात दाखल झाली होती त्यावेळी ५ विमाने आली होती. त्यानंतर दुसरी खेप ३ नोव्हेंबर रोजी आली त्यात तीन विमाने आणि २७ जानेवारी रोजी आणखी तीन राफेल हवाई दलात दाखल झाली होती. आत्तापर्यंत ११ राफेल भारताला मिळाली आहेत.

संसद अर्थसंकल्पीय अधिवेशनात संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी मार्च मध्ये १७ राफेल भारताला मिळणार असल्याचे आणि पुढच्या एप्रिल पर्यंत सर्व ३६ राफेल वायुदलात दाखल होत असल्याचे सांगितले होते. केंद्र सरकारने फ्रांसच्या दोसाँ कंपनीकसून ५९ हजार कोटी मध्ये ही ३६ विमाने खरेदीचा करार केला आहे. एप्रिलच्या मध्यापर्यंत राफेल लढाऊ विमानांचे दुसरे स्क्वाड्रन कार्यरत होत असल्याचे समजते.