यंदा परवडणाऱ्या किंमतीत मिळणार आंबे

देशाच्या मंद झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी फळांचा राजा आंबा पूर्ण तयार झाला असून सरकारनेही त्याबाबत रणनीती तयार केली आहे. प्रत्येक नागरिकाला रास्त दरात आंबा उबलब्ध व्हावा यासाठी धोरणे आखली जात आहेत. विशेष म्हणजे प्रतिकूल हवामानात सुद्धा आंबा उत्पादन २०२० च्या तुलनेत अधिक होणार आहे आणि त्याचा फायदा किंमती नियंत्रणात राहण्यासाठी होईल असे सांगितले जात आहे. यंदा गतवर्षीच्या तुलनेत आंबा किंमती १० टक्के कमी असतील असेही सांगितले जात आहे.

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदा देशात २१.१२४ मेट्रिक टन आंबा उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी पेक्षा हे उत्पादन १ मेट्रिक टनने वाढले आहे. अर्थात २०१९ च्या तुलनेत हे उत्पादन कमी आहे. २०१९ मध्ये आंबा उत्पादन २१.३७८ मेट्रिक टन होते. गतवर्षीच्या तुलनेत हे उत्पादन ४ टक्के वाढले आहे.

महाराष्ट्रात मात्र हापूस उत्पादक संघटनेने दिलेल्या माहितीनुसार यंदा उत्पादन चांगले येईल पण बाजारात हापूस नेहमीच्यापेक्षा १ महिना उशिरा येईल. दरवर्षी मार्च मध्ये हापूस बाजारात येतो यंदा एप्रिल पासून हापूस बाजारात येईल. यंदा राज्यात हवामान विचित्र होते. लांबलेला पावसाळा, मधेच थंडी आणि आता उकाडा यामुळे डिसेंबर मध्ये मोहरावर येणाऱ्या झाडांना यंदा जानेवारीत मोहर आला आहे. परिणामी आंबा तयार होण्यास उशीर होणार आहे.

राज्यात यंदा दीड लाख हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड केली गेली आहे. देवगड हापूस उत्पादक संघटनेचे अजित गोगटे म्हणाले मार्च ते मे असा हापूस सिझन असतो. देवगड हापूसला भौगोलिक ओळख म्हणजे जीए टॅग मिळाला आहे.