एका अद्भूत मण्यावर बांधले गेलेय मतंगेश्वर मंदिर

मध्य प्रदेशातील खजुराहो येथील मतंगेश्वर महादेव मंदिर देशविदेशातील भाविकांचे आस्था केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. बुंदेलखंडात असलेले हे मंदिर प्राचीन म्हणजे सुमारे १ हजार वर्षापूर्वी बांधले गेले असून चंदेल राजा हर्षवर्मान याने ९ व्या शतकात या मंदिराची उभारणी केली असे मानले जाते. विशेष म्हणजे हे मंदिर एका अद्भूत मण्यावर बांधले गेले आहे.

या विशाल मंदिराच्या गर्भगृहात ६ फुट उंच जलहरीवर ९ फुट उंच शिवलिंग आहे. असे सांगतात हे शिवलिंग जेवढे जमिनीच्या वर दिसते तितकेच ते जमिनीत सुद्धा आहे. या मंदिरात भाविकांच्या व्यक्त केलेल्या मनोकामना पूर्ण होतात असे म्हणतात. शिवलिंगाला अभिषेक करताना जलहरी चढूनच करावा लागतो. या मंदिरात भाविकांची नेहमीच गर्दी असते पण महाशिवरात्र, मकर संक्रांत आणि अमावस्येला अधिक संखेने भाविक येतात.

या मंदिराची कथा अशी सांगतात, खुद्द महादेवाने, व्यक्त केलेल्या सर्व इच्छांची पूर्ती करणारा खास इच्छामणी पांडव राजा युधिष्ठिर याला दिला होता. युधिष्ठीराने हा मणी मतंग ऋषींना दान केला. या ऋषींनी हा मणी बुंदेलखंडाचा चंदेल राजा हर्षवर्मन याला दिला तेव्हा त्याने हा मणी जमिनीत पुरून त्यावर हे मंदिर बांधले.