रोबो निवडणूक प्रचारात उतरण्याच्या तयारीत
एप्रिल ते मे दरम्यान देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत असून तामिळनाडूतील एक राजकीय पार्टीचे निवडणूक चिन्ह रोबो आहे. हा पक्ष निवडणूक प्रचारात तीन डझनाहून अधिक बोलके रोबो उतरविणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. परदेशात निवडणूक प्रचारात रोबोंचा वापर सर्रास केला जात असून भारतात अजून तरी असा वापर झालेला नाही.
एआय तंत्रज्ञानावर आधारलेले हे ह्युमेनॉईड रोबो नेत्यांची अगोदरच रेकॉर्ड केलेली भाषणे वाचून संबंधित नेत्याप्रमाणे हावभाव करू शकतात. सोशल मिडियावरील प्रचारानंतर रोबो तर्फे केला जाणारा उमेदवाराचा प्रचार उमेदवारासाठी मदतीचा ठरणार आहे. हे रोबो उमेदवाराचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविणे आणि नेत्याप्रमाणे भाषण करणे अशी कामे करू शकणार आहेत.
ह्युमेनॉईड रोबोंचा वापर यापूर्वी बाजारात विक्रेता मदतनीस, शाळेत शिक्षक सहाय्यक, चिकित्सा मदत सहाय्यक म्हणून केला जात आहे. २ ते ५ लाखात मिळणारे हे रोबो अनेक भाषा बोलू शकतात. त्यांच्यामुळे परंपरागत निवडणूक प्रचारात रंगत येऊ शकते. हे रोबो लोकांशी संवाद साधणे, चेहरा ओळखणे, माणसाप्रमाणे हावभाव करणे अश्या अनेक कृती करू शकतात. थ्रीडी डेप्थ सेन्सिंग तंत्राचा वापर यासाठी केला जातो.