ट्रम्प यांच्या बुद्धस्वरूपातील मूर्तींची चीन मध्ये तडाख्यात विक्री

अमेरिका आणि चीन हे दोन्ही देश सध्या एकमेकांकडे वाकड्या नजरेने पाहत असले तरी एका चीनी व्यापाऱ्याने बुद्धाप्रमाणे ध्यानस्थ बसलेल्या अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांच्या मूर्तींची विक्री सुरु केली आहे. त्याला ग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. ज्योमोशी नावाच्या एका चीनी ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर या मूर्ती विकल्या जात आहेत. हा ग्रुप अलीबाबाच्या मालकीच्या असल्याचे सांगितले जात आहे.

ट्रम्प यांनी निवडणूक काळात केलेल्या ‘मेक युअर अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेवरून प्रेरणा घेऊन ‘मेक युअर कंपनी ग्रेट अगेन’ या घोषणेसह या मूर्ती विकल्या जात आहेत. ताओबा नावाच्या व्यक्तीने अश्या १०० मूर्ती सिरामिक पासून तयार केल्या आहेत. त्यातील छोटी मूर्ती पाच फुट उंचीची तर मोठी १४ फुट उंचीची आहे. त्यांच्या किंमती अनुक्रमे १५० डॉलर्स आणि ६१० डॉलर्स म्हणजे भारतीय रुपयात ११ हजार आणि ४४ हजार अश्या आहेत.

या मूर्तीतील ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर अतिशय शांत भाव असून त्यांनी हात मांडीवर ठेवले आहेत. ध्यानस्थ अवस्थेत बसलेल्या ट्रम्प यांच्या केसांची स्टाईल मात्र ओरिजिनल आहे. या मूर्तीसोबत ट्रम्प टॉयलेट ब्रश सुद्धा विक्रीसाठी आणले गेले असून त्यांची किंमत ३ ब्रश साठी दोन डॉलर्स आहे.