मुंबईतील जॉगर्स पार्कमध्ये एका रात्रीत कोणी उभारला हा चकाकणारा मोनोलिथ ?


मुंबई – संपूर्ण जगासाठी २०२० हे वर्ष लक्षात रहाणारे ठरले असून या वर्षामध्ये कोरोना साथीबरोबरच अनेक अशा गोष्टी घडल्या, ज्यामुळे सर्वसामान्यांपासून सर्वंचजणांना अगदी चक्रावून जाण्याची वेळ आली. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये दिसून आलेले मोनोलिथ म्हणजेच मोठ्या आकाराचे पट्टीसारखे धातूचे स्तंभ अशाच गोष्टींपैकी एक होती. गुजरातमध्येही एका ठिकाणी वर्षाच्या शेवटच्या दिवशी असा मोनोलिथ दिसून आला होता. त्यानंतर आता जवळजवळ अडीच महिन्यांनी मुंबईमध्ये मोनोलिथ आढळून आला आहे.

बुधवारी सकाळी वांद्रे येथील जॉगर्सपार्कमध्ये नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या अनेकांना पार्कमध्ये १२ फूट उंचीचा चमकणारा धातूचा स्तंभ म्हणजेच मोनोलिथ दिसला. हा मोनोलिथ पार्कच्या अगदी मध्यभागी उभा होता. या मोनोलिथच्या आजूबाजूला काही रोपटीही दिसून आली. हा मोनोलिथ येथे एका रात्रीत कोणीतरी उभारल्याचे सांगण्यात येत आहे. पण तो कोणी, कधी, कशासाठी उभारला या मागील रहस्य अद्याप कायम आहे.

या मोनोलिथचे काही फोटो वांद्रे येथील स्थानिक नगरसेवक आसिफ झकारिया यांनी ट्विटरवरुन शेअर केले. हा मोनोलिथ वांद्रे येथील जॉगर्सपार्कमध्ये आढळून आल्याचे आसिफ यांनी अशा कॅप्शनसहीत काही फोटो शेअर केले आहेत. तसेच त्यांनी पुढे या मोनोलिथचा अर्थ काय असेल शोधून काढले पाहिजे, असेही म्हटले आहे. त्याचप्रमाणे हा मोनोलिथ किती दिवस राहील हे सांगता येत नसल्याने यासोबत एक फोटो काढण्याची इच्छाही आसिफ यांनी व्यक्त केली.


भारतामध्ये यापूर्वी ३१ डिसेंबर रोजी थालतेज येथील सिम्फॉनी पार्कमध्ये एक मोनोलिथ आढळून आला होता. हा मोनोलिथ शहरातील काँक्रीटच्या जंगलात मध्यभागी असणाऱ्या या पार्कमध्ये आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते. विशेष म्हणजे यापूर्वीही जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये आढळून आलेल्या धातूच्या स्तंभांशी हा मोनोलिथ खूप जास्त प्रमाणात मिळता जुळता होता. त्रिकोणी आकाराचा हा स्तंभ खूपच चमकदार होता. पण जगभरातील इतर रहस्यमयरित्या दिसू लागलेल्या मोनोलिथप्रमाणे हा मोनोलिथ नसून तो काय सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यावरील आकड्यांवरुन दिसून आले.

काही आकडे या त्रिकोणी स्तंभाच्या एका बाजूला कोरलेले होते. अगदी जवळून पाहिल्यास हे आकडे दिसून येत होते. पर्यावरणाचे संवर्धन आणि जंगली प्राण्यांचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे या आकड्यांवरुन सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. नंतर हे आकडे म्हणजे देशभरातील महत्वाच्या राष्ट्रीय उद्यानांचे स्थान दाखवणारे आकडे असल्याचे स्पष्ट झाले.

यामधून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मुंबई आढळून आलेला मोनोलिथ देखील अशाच प्रकारचा आहे. पण हा मोनोलिथ कोणी तयार केला हे अद्याप समजू शकलेले नाही. जगभरातील अनेक ठिकाणी २०२० च्या नोव्हेंबर महिन्यापासून असे मोनोलिथ आढळून आले आहेत. अनेक मोनोलिथ कोणी आणि कशासाठी उभारले होते हे अद्यापर्यंत एक रहस्यच आहे.