वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहलीच्या RCB मधून स्टार खेळाडूची स्पर्धेतून माघार


नवी दिल्ली – विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाआधी मोठा धक्का बसला आहे. आयपीएलमधून आरसीबीचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज जोश फिलिप बाहेर झाला आहे. याबाबतची माहिती रॉयल चॅलेंजर्सने ट्विटरद्वारे दिली.


वैयक्तिक कारणास्तव ऑस्ट्रेलियाच्या जोश फिलिप याने आयपीएलमधून माघार घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे जोश फिलिपच्या जागी आरसीबीने न्यूझीलंडचा यष्टीरक्षक फलंदाज फिन एलनला याला संघात स्थान दिले आहे.

आयपीएलच्या 13 व्या हंगामात जोश फिलीपीने आरसीबीकडून पदार्पण केले होते. त्याने सलामीला येत 5 सामन्यात 78 धावा केल्या होत्या. पण यंदाच्या आयपीएलमधून त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर, आयपीएल लिलावात 21 वर्षीय फिनवर कोणीही बोली लावली नव्हती. त्याची बेस प्राईस 20 लाख एवढी होती.

पण आता जोश फिलिपने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतल्याने फिनला आरसीबीकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. अद्याप न्यूझीलंडच्या राष्ट्रीय संघात फिनने पदार्पण केलेले नाही, पण अलिकडेच संपलेल्या न्यूझीलंडमधील स्थानिक स्पर्धेत त्याने शानदार फॉर्म दाखवला आणि 11 सामन्यात 56.88 च्या सरासरीने व 193 च्या स्ट्राइक रेटने 512 धावा ठोकल्या होत्या.