ममतांचा रुग्णालयातील फोटो पोस्ट करत खासदार भाच्याचा भाजपला इशारा


कोलकाता – निवडणूक प्रचारादरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर नंदीग्राममध्ये हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत असून बुधवारी ४-५ जणांनी निवडणूक प्रचारादरम्यान आपल्याला धक्काबुक्की करून ढकलल्यामुळे आपल्या पायाला जखम झाल्याचा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.

रेयापारानजीक एका स्थानिक मंदिरात प्रार्थना केल्यानंतर ममता तेथून निघण्याच्या तयारीत असताना सायंकाळी ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. असे असतानाच आता ममतांचा रुग्णालयामधील फोटो ट्विट करत ममता यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपला इशारा दिला आहे.


ममतांचा रुग्णलयामधील फोटो अभिषेक यांनी ट्विट केला आहे. ममता या फोटोमध्ये रुग्णालयातील बेडवर असून त्यांच्या डाव्या पायाला प्लॅस्टर केल्याचे दिसत आहे. अभिषेक यांनी हा फोटो ट्विट करताना, भाजपने तयार रहावे. त्यांना बंगालच्या लोकांची ताकद रविवारी २ मे रोजी दिसणार आहे. त्यामुळे तयार राहा, असे म्हटले आहे. बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा २ मे रोजी निकाल असून मतपेटीमधून बंगालचे लोक भाजपविरुद्धचा राग व्यक्त करतील, असे संकेत अभिषेक यांनी आपल्या ट्विटमधून दिले आहेत.

ममतांनी माझ्यावर हल्ला झाला, असा दावा बुधवारी केला. माझ्या गाडीबाहेर मी उभी होते व गाडीचे दार उघडे होते. गाडीत मी बसत असताना ४-५ लोकांनी दार ढकलले, ते माझ्या पायावर आपटले. याने झालेल्या जखमेमुळे माझा पाय सुजला असून मला तापासारखे वाटत असल्याचे ममता म्हणाल्या. त्यांना नंतर सरकारी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. हे नक्कीच ‘कारस्थान’ असल्याचा आरोप ममता यांनी केला. झेड प्लस सुरक्षाकवच त्यांना असल्यामुळे, त्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. दरम्यान, ममतांवरील या कथित हल्ल्याबाबत निवडणूक आयोगाने राज्य पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी रात्री रुग्णालयात जाऊन ममता यांची विचारपूस केली.