जे. जे. रुग्णालयामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस


मुंबई – मुंबईमधील जे. जे. रुग्णालयामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी आज दुपारी साडेबाराच्या सुमारास कोरोनाची लस घेतली. त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि त्यांचे पुत्र तसेच पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सुद्धा यावेळी उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी कोरोनाची लस कोरोना लसीसंदर्भातील संभ्रम दूर व्हावा या हेतूने घेतली असून सर्वांनीच लसीकरणाच्या मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असा संदेश देण्यासाठी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी लस घेतली आहे. कोव्हिशिल्ड ही लस उद्धव ठाकरे यांनी घेतल्याची माहिती समोर येत आहे. उद्धव ठाकरेंबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनीही कोरोनाची लस घेतली आहे.


नागरिकांमध्ये असलेला कोरोना लसीकरणासंदर्भातील संभ्रम दूर व्हावा आणि जास्तीत जास्त लोकांनी या लसीकरणामध्ये सहभागी व्हावे यासाठी राजकीय नेत्यांनी, सेलिब्रिटींनी आणि समाजातील प्रभावशाली व्यक्तींनी पुढाकार घेत लसीकरण केले पाहिजे, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पुढाकार घेत लसी टोचून घेतली आहे. उद्धव ठाकरेंनी आज आपल्या कुटुंबियांसोबत जे. जे. रुग्णालयामध्ये जाऊन लस घेतली. त्यावेळी डॉ. तात्याराव लहाने देखील उपस्थित होते. उद्धव यांच्यासोबतच त्यांच्या निकटवर्तीयांपैकी रश्मी ठाकरेंच्या आई मीनाताई पाटणकर यांनीही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. उद्धव यांनी लस घेतली तेव्हा ठाकरे कुटुंबियांबरोबरच डॉ तात्याराव लहाने, आरोग्य प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, टास्क फोर्सचे डॉ शशांक जोशीही उपस्थित होते.